लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तातडीने ९ जानेवारीला रात्री भूलतज्ज्ञ म्हणून आदेश काढला गेला; पण ते डॉ. दीपक शिंदे हजरच झालेले नाहीत आणि ज्या अनुभवी भूलतज्ज्ञ आहेत त्या डॉ. आरती घोरपडे १५ दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेल्या. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सीपीआरच्या प्रशासनाने केले आहे. त्यामुळे बंद असलेल्या हृदयशस्त्रक्रिया अजून सुरूच झालेल्या नाहीत.
भूलतज्ज्ञ उपलब्ध करून दिला जात नसल्याने हृदय शस्त्रक्रिया बंद असल्याचे वृत्त शुक्रवार, दि. ८ जानेवारीला ‘लोकमत’च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत शिवसेनेने सीपीआर प्रशासनावर नऊ जानेवारीला हल्लाबोल केला. जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याशी चर्चा करून सोमवारी जर भूलतज्ज्ञ मिळाला नाही, तर खुर्चीत बसू देणार नाही असा इशारा दिला. यावेळी भूलतज्ज्ञ आणि हृदयशस्त्रक्रिया विभागाच्या डॉक्टरांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली.
या बैठकीनंतर ९ जानेवारीला रात्रीच बधिरीकरणशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. दीपक शिंदे यांना भूलतज्ज्ञ म्हणून हृदयशस्त्रक्रिया विभागाकडे हजर होण्याचे आदेश काढण्यात आले. परंतु, ते या विभागाकडे हजरच झाले नाहीत. याच दरम्यान ज्या वरिष्ठ आणि अनुभवी भूलतज्ज्ञ आहेत त्या डॉ आरती घोरपडे या १५ दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेल्या आहेत.
त्यामुळे अजूनही पूर्णवेळ भूलतज्ज्ञाची गरज असताना ती पूर्ण करण्यात आलेली नाही. पुन्हा आता डॉ. हेमलता देसाई यांची भूलतज्ज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्या याआधीही वैद्यकीय अधिकारी या पदावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत होत्या आणि भूलतज्ज्ञ म्हणून सेवा देत होत्या. त्यांची आता नेमणूक झाली असली तरी त्यांनी पूर्ण वेळ आठवडाभर सेवा देणे शक्य नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. कायमस्वरूपी भूलतज्ज्ञ द्या जेणेकरून हृदयशस्त्रक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया सुरू राहतील, अशी या विभागाच्या डॉक्टरांची मागणी आहे. परंतु, जे नेमले ते हजर झाले नाहीत, ज्यांना नेमा म्हणून मागणी आहे त्या घोरपडे वैद्यकीय रजेवर आणि ज्या पूर्ण आठवडाभर येऊ शकणार नाहीत त्यांची नियुक्ती असा कारभार सुरू आहे.
चौकट
बुधवारी होणार होता गोंधळ
बुधवारी, १३ जानेवारीला अचानक एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. परंतु नियुक्ती आदेश दिलेले भूलतज्ज्ञ आले नाहीत. अखेर यावरून रात्रीच सीपीआरमध्ये वादंग होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे डॉ. हेमलता देसाई यांना यावेळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले.
चौकट
आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गोंधळ
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील या जिल्ह्यातील. ते शिवसेनेच्या कोट्यातून झालेले मंत्री. त्यांच्याच जिल्हाप्रमुखांनी हा प्रश्न लावून धरलेला. भूलतज्ज्ञ दिल्याचे लेखी पत्रही बैठकीनंतर दिलेले. परंतु, शिवसेनेसह सर्वांचीच फसवणूक झाली असे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यानंतर तरी मंत्री लक्ष देणार का, अशी विचारणा होत आहे.