कृष्णा सावंत - पेरणोली -फेब्रुवारी चालू झाला तरी अद्याप निम्म्यावर उसाची उचल न झाल्याने पेरणोली (ता. आजरा) येथील परिसरातील उसाची उचल कधी होणार, अशी विचारणा शेतकऱ्यांमधून होत आहे.पेरणोलीसह साळगाव, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, कुरकुंदे, आदी गावांत उसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आजरा तालुका हा मुबलक प्रमाणात असलेला उसाचा मोठा पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांत सातत्याने या विभागावर उचलीच्या संदर्भात अन्याय होत आहे.आजरा कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण करण्यासाठी व गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अन्य तालुक्यात टोळ्या असल्या, तरी तालुक्यातील ज्या भागात उसाचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात टोळ्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. मात्र, तसे न होता ज्या कारखाना सेंटरमध्ये उसाचे प्रमाण कमी आहे, त्या सेंटरपेक्षा जास्त ऊस उपलब्ध असलेल्या सेंटरमध्ये टोळ्यांचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.सुलगावमध्ये १५०० टन, तर आजऱ्यात ३ ते ४ हजार टन ऊस आहे. मात्र, या दोन्ही गावांत एकूण सहा टोळ्या कार्यरत आहेत. पेरणोली सेंटरला २३ हजार टनांपेक्षा अधिक ऊस उपलब्ध असताना केवळ सहाच टोळ्या आहेत. त्यात पेरणोलीमध्ये तीन व साळगावात तीन टोळ्या आहेत. कोरीवडे, देवकांडगाव, हरपवडे, कुरकुंदे या ऊस उपलब्ध असलेल्या ठिकाणी एकही टोळी नसल्याने कारखान्याच्या प्रशासनाविषयी नाराजी व्यक्तकरण्यात येत आहे.ज्यांचा ऊस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गेला आहे, त्यांची जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तोडीची नोंद पेरणोली सेंटरमध्ये आहे. त्यामुळे क्रमपाळीत गोंधळ झाला आहे.ज्यांनी गेल्या पाच वर्षांत अन्य कारखान्यांना ऊस पाठविला आहे, अशा लोकांचा ऊस अगोदर जातो. ज्यांनी प्रामाणिकपणे दराचा विचार न करता आजरा कारखान्यालाच ऊस पाठविला, त्यांना क्रमपाळी दाखवली जाते. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे पेरणोलीसह कुरकुंदे, कोरीवडे, देवकांडगावात जादा टोळ्यांच्या मागणीचा जोर वाढत आहे.उसाची उपलब्धता लक्षात घेता टोळ्या वाढविण्यासाठी नियोजन सुरू आहे. एक ते दोन दिवसांत आणखी टोळ्या पाठवून देऊ.- विष्णुपंत केसरकर, अध्यक्ष, आजरा साखर कारखाना
अद्याप २० हजार टन ऊस शिवारात उभा
By admin | Published: February 01, 2015 9:39 PM