कळे :
कळे (ता. पन्हाळा) : येथील कोल्हापूर -बाजार भोगाव-अनुस्कुरा राज्य मार्गावर कुंभारवाडा चौक ते पुनाळ फाटा चौकदरम्यान गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यालाच गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. सार्वजनिक आरोग्यच धोक्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी कळे ग्रामस्थांसह प्रवासी वर्गातून होत आहे.
कोल्हापूर - बाजार भोगाव-अनुस्कुरा या राज्य मार्गावर कळे ही पश्चिम पन्हाळ्यातील मोठी बाजारपेठ आहे. हा रस्ता प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. सांडपाण्याचा गटारीतून योग्यप्रकारे निचरा न झाल्याने थोडा जरी पाऊस आला तरी या राज्य मार्गावर जवळपास १ फुटादरम्यान पाणी येते. गटारीतील तुंबलेले पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पुनाळ फाट्याशेजारील काही नागरिकांनी गटारीचे पाणी घरात किंवा दुकानात जाते म्हणून मुरूम टाकून अडविल्याने रस्त्यालाच गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेले कित्येक दिवस हे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरच साठून राहिल्याने या परिसरात डासांचे साम्राज्य पसरले आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी बाजारपेठेतील या सर्व रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त होते. दुर्गंधीयुक्त गटारातील सांडपाण्यामुळे दुकानदारांसह ग्राहक बेजार झाले आहेत. कळे ग्रामपंचायतीने विशेष प्रकल्प बांधकाम उपविभाग गगनबावडा उपअभियंता यांना लेखी पत्राने कळविले आहे.
पावसाळ्यात कळे ग्रामपंचायतची गटर साफ करण्याची जबाबदारी नसतानाही केवळ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ४ वेळा गटार साफ केली जाते. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा.
सुभाष सर्जेराव पाटील
-सरपंच, कळे-खेरिवडे ग्रामपंचायत
नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम विभाग व कळे -खेरिवडे ग्रामपंचायतीने सामंजस्याने हा प्रश्न मार्गी लावावा.
एकनाथ शंकर पाटील
सामाजिक कार्यकर्ते
चौकट- ३) गटारचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रसायनयुक्त असल्याने व शेजारील शेतात गेल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सोबत फोटो मेल केला आहे -
फोटो अोळ - कळे ( ता. पन्हाळा ) येथील कोल्हापूर-बाजार भोगाव-अनुस्कुरा या राज्य मार्गावर कुंभारवाडा चौक ते पुनाळ फाटा चौकदरम्यान गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आल्याने संपूर्ण रस्त्यालाच गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.