कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने गुरुवार शहरातील फिरंगाई, सदरबाजार व खासगी रुग्णालयात मिळून १,३०० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. लस उपलब्ध न झाल्यामुळे आज, शुक्रवारी सदरबाजार येथील एका केंद्रावरच लसीकरण केले जाणार आहे.
महापालिकेकडे प्राप्त झालेली कोरोना प्रतिबंधात्मक लस संपली असून दुर्दैवाने ही मोहीम आज, शुक्रवारी थांबवावी लागणार आहे. लसीकरणास सुरवातीला कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लस असूनही लाभार्थी येत नव्हते. आता कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला तशी लस संपली आणि लसीकरण केंद्रावर गर्दी वाढायला लागली आहे. परंतु लस न मिळाल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
गुरुवारी फिरंगाई प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे १६१ नागरिकांना, सदरबाजार प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे ३९५ नागरिकांना, सीपीआर हॉस्पिटल येथे २१० नागरिकांना व उर्वरित खासगी हॉस्पिटलमध्ये ५४३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
शहरात आतापर्यंत ७५ हजार २१९ नागरिकांना पहिल्या डोसचे तर ८,५०२ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. ४५ वर्षांवरील ३१ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
महापालिकेकडे उपलब्ध असलेला लसीचा साठा पाहता आज, शुक्रवारी प्राथमिक आरोग्य नागरी केंद्र सदरबाजार व सीपीआर हॉस्पिटल या ठिकाणी लसीकरण सुरु राहणार आहे. तसेच मान्यता प्राप्त खासगी हॉस्पिटलात लस उपलब्ध असून २५० रुपये इतके नाममात्र शुल्क देऊन लसीकरण करुन घेता येईल.