कोल्हापूर : दीड लाखाचे कर्ज फेडण्यासाठी दुचाकींची चोरी करून त्यांची विक्री करण्याची शक्कल एका चोरट्याने लढवली. मात्र, चोरलेल्या गाड्या विकण्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागल्याने दुचाकी चोरीच्या नऊ गुन्ह्यांची उकल झाली. नीलेश बाबासो सावंत (वय ३६, रा. सिद्धाळा गार्डन, मंगळवार पेठ, कोल्हापूर), असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.२९) सकाळी सापळा रचून तपोवन मैदानात सावंत याला अटक केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरीच्या वाढलेल्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिस अंमलदार युवराज पाटील व सागर माने यांना मंगळवार पेठेतील नीलेश सावंत याची माहिती मिळाली. गुरुवारी सकाळी सावंत तपोवन मैदानातील शाळेजवळ चोरीतील दुचाकी घेऊन येणार असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार सापळा रचून त्याला पथकाने ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी चोरीतील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने शहरातून नऊ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. चोरीतील नऊ दुचाकी आणि चोरीसाठी वापरलेल्या एका दुचाकीसह पोलिसांनी पाच लाख ३५ हजार रुपये किमतीच्या एकूण दहा दुचाकी जप्त केल्या. पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे यांच्यासह युवराज पाटील, सुरेश पाटील, सागर माने, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, प्रवीण पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरल्या दुचाकीजुना राजवाडा - ५शाहूपुरी - ३लक्ष्मीपुरी - १
नोकरी गेल्याने चोरीची दुर्बुद्धीबी.कॉम.च्या पहिल्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलेला नीलेश सावंत एका कंपनीत संगणक ऑपरेटर म्हणून काम करीत होता. तीन वर्षांपूर्वी फटाके उडवताना त्याच्या हाताची दोन बोटे निकामी झाली. त्यानंतर नोकरी गेल्याने त्याच्यावर दीड लाखाचे कर्ज झाले. ते कर्ज फेडण्यासाठी दुचाकींची चोरी करण्याची शक्कल त्याने लढवली.