आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ : रंकाळा येथील क्रशर चौक ते अंबाई टँक परिसरातील धोबी खणीत सडलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या चार दुचाकी चोरीच्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरी केल्यानंतर पुरावा नष्ट करुन पोलिसांच्या हाती लागू नये, अशी युक्ती लढवून चोरट्यांनी त्या खणीत टाकल्याची शंका पोलिसांना आहे.
क्रशर चौक ते अंबाई टँक येथील म्हसोबा मंदिराशेजारी रंकाळ्याला लागून असलेल्या धोबी खणीत धोब्यांसह मासेमाऱ्यांना चार दूचाकी मिळून आल्या. सर्व सडलेल्या अवस्थेत होत्या. जुनाराजवाडा पोलिसांनी पंचनामा करुन त्या पोलिस ठाण्यासमोर आनल्या. त्यानंतर पोलिसांनी दूचाकीच्या नंबरवरुन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे चौकशी केली. त्यामध्ये दोन मालक निष्पन्न झाले.
(एम. एच. ०९ एक्स ३६८७) ही वंदना रामचंद्र पाटील (रा. गंगावेश) यांच्या मालकीची दुचाकी आहे. तर ती चोरीला गेल्यानंतर त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. (एम. एच. ०९ सी.डी. ३४२२) ही अमित विष्णु कांबळे (रा. आळते, ता. हातकणंगले) यांच्या मालकीची आहे. त्यांची दूचाकी चोरीला गेली होती. त्यासंबधी हातकणंगले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अन्य दोन दूचाकीना नंबर नाहीत. चेस नंबरवरुन त्यांच्या मुळ मालकांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)