निंगाप्पा बोकडे
चंदगड : हलकर्णी येथील अथर्व-दौलतच्या कामगारांनी बोनसच्या मागणीचा निर्णय न होताच कामावर हजर झालेल्या कामगारांना जाब विचारत मारहाण करत कारखान्यांवर दगडफेक केली. याप्रकारानंतर कारखाना कार्यस्थळावर तणावपुर्ण वातावरण बनले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले. पण दिवसभराच्या चर्चेच्या गुहाळानंतर तोडगा निघाला नाही.गेल्या काही दिवसांपूर्वीच अथर्व-दौलतच्या कामगारांनी पुकारलेला संप जिल्हाधिकाऱ्यांच्या मधस्थीनंतर मिटला होता. त्यानंतर कामगारांनी अथक परिश्रम घेऊन कारखान्याचे कामही मार्गी लावले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी कामगार संघटनेने दोन पगार बोनस मिळावे म्हणून मागणी केली होती. तसेच हा निर्णय झाल्याशिवाय शिफ्टमध्ये कामाला येण्याची सक्ती करु नका, अशी मागणी कामगारांनी कारखाना प्रशासनाकडे केली होती. पण रविवारी रात्री कारखाना प्रशासनाने कामगारांना शिफ्टची नोटीस पाठवली. त्यानुसार काही कामगार कामगार कामावरही हजर झाले होते. पण उरलेले कामगार जनरल शिफ्टमध्ये कामावर हजर होण्यासाठी गेले असता गेट बंद करून त्यांना आत घेतले नाही. या रागातून कामगारांनी हजर असलेल्या कामगारांना जाब विचारत माराहाण केली. त्यानंतर दगडफेक करून कारखान्याचे गेट टकलून आत प्रवेश केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. त्यानंतर तहसीलदार विनोद रणवरे, पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, गणेश फाटक, पांडूरंग बेनके, विष्णू गावडे यांनी मधस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. त्यानंतर प्रा. सुभाष जाधव, आबासाहेब चौगुले, प्रदीप पवार यांच्यासह काहीजणांनी चेअरमन मानसिंग खोराटे यांच्याशी चर्चा केली पण त्यातही काही निष्पन्न झाले नाही.