कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून वाढत्या मागणीमुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. याद्वारे रुग्णांची व नातेवाइकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची तातडीची बैठक घ्यावी, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केली.
यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी बैठकीची सूचना मान्य करीत इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती क्षीरसागर यांना केली.
क्षीरसागर म्हणाले, काही रुग्णालयांत गरज नसलेल्या रुग्णांनादेखील हे इंजेक्शन दिले जात असल्याने गरजूंचा इंजेक्शनअभावी मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरजू असणाऱ्या रुग्णांसाठीच त्याची सोय करण्यात यावी. राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या प्रमाणात जिल्ह्याला इंजेक्शनचा होणारा पुरवठा ०.७४ टक्के इतका अत्यल्प आहे. इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी रुग्णालयांची एकत्र बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना देण्यात याव्यात. वाढती रुग्णसंख्या पाहता कोल्हापूर महापालिकेने दसरा चौकात स्वतंत्र तपासणी केंद्र उभे करावे. टेंबलाईवाडी येथे आयआरबी कंपनीला दिलेल्या पाच एकरांतील इमारतीत जंबो कोविड सेंटर उभारण्याचीही त्यांनी सूचना केली.
---
फोटो नं : २३०४२०२१-कोल-राजेश क्षीरसागर
ओळ : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी रेमेडेसिवीर इंजेक्शन तुटवड्यासंबंधी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा केली.
---