कुरुंदवाड : येथील माळभागावरील देवस्थानच्या जमिनीवर महिपती बाबर हे बेकायदेशीर मोबाईल टॉवर उभारत आहेत. टॉवरचे बांधकाम त्वरित थांबवावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अॅड. प्रसाद पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी तहसीलदार अपर्णा मोरे यांना दिला आहे. त्यामुळे दोन गटांत वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, तहसीलदार मोरे यांनी शहर मंडल अधिकारी यांना तक्रारदारांच्या निवेदनानुसार पोलिसांच्या सहकार्याने योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
येथील माळभागावर मयूरेश्वर देवस्थानची गट नं. १९६५ मध्ये मिळकत जमीन आहे. शासनाने ही जमीन महिपती बाबर यांना कसण्यास दिली आहे. मात्र या मिळकतीत बदल करण्याचा अधिकार बाबर यांना नसताना ते स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या मिळकतीमध्ये मोबाईल टॉवर उभारत आहेत. माळभागातील ही मध्यवस्ती असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने टॉवरचे काम तत्काळ थांबविण्याची मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर आनंद ओतारी, शशिकांत पवार, अमोल मोरे, तुकाराम माळी, सचिन परीट, सहदेव केंगाळे, दिनेश काटकर यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत.