हातकणंगले : मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या एजंटाकडून सक्तीने सुरू असलेली कर्ज वसुली थांबवावी, कोरोनाच्या संकटामध्ये कंपन्यांनी कर्जे माफ करावीत या मागण्यांसाठी महिलांनी सोमवारी बंडखोर सेनेचे शिवाजी आवळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला.
कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊन काळात अनेक महिलांचे रोजगार बंद झाल्याने मुश्कील झाले असताना, मायक्रो फायनान्स कंपन्या वसुलीसाठी महिलांकडे सक्ती करत आहेत. महिलांची आर्थिक स्थिती कोलमडलेली असताना खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीसाठी एजंटामार्फत तगादा लावला आहे.
आर्थिक अडचणी लक्षात घेऊन मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सक्तीची कर्ज वसुली थांबवावी. वसुलीसाठी आलेल्या कंपनी एजंटांवरती गुन्हे दाखल करावेत, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रदीप उबाळे यांना देण्यात आले.
एल्गार मोर्चात जिल्हा अध्यक्ष विकास अवघडे , सुरेश आवळे , अभीषेक भंडारे , सुभाष शिलेवंत , दिलीप लाड, शंकर चौगुले , अर्जुन वाघमारे, राजेंद्र लोंढे , आयेशा बिजली, दीपाली आवघडे , शोभा पाटील , वैशाली पवार यांच्यासह आंदोलक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.