मुरगूड : राज्यामध्ये नव्हे, तर देशामध्ये अव्वल असणारा गोकुळ दूध संघ हा जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. आठ दिवसाला कोट्यवधी रुपये सभासदांना देऊन हजारो संसार फुलविणाºया संस्थेची बदनामी थांबवा. तथ्य नसणारे आरोप थांबवावेत, अन्यथा दूध उत्पादक सभासदांसह आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रणजितसिंह पाटील यांनी दिला.
सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघावर विविध मुद्द्यांवर बेछूट आरोप केले आहेत. याचा निषेध करण्यासाठी सत्ताधारी मंडळींकडून ७ डिसेंबरला कोल्हापूर येथे निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील दूध उत्पादक सभासदांचा मेळावा आयोजित केला होता. या मोर्चाला कागल तालुक्यातून हजारो दूध उत्पादक जाणार असल्याचे पाटील यांनी मेळाव्यात सांगितले.
मेळाव्याला तालुका संघाचे संचालक नानासो पाटील, मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष अशोक खंडागळे, महादेव पेडणेकर, रघुनाथ बोगार्डे, रघुनाथ कुंभार, आदी उपस्थित होते.यावेळी रणजितसिंह पाटील म्हणाले, सध्या दुधाचा दर कमी केला म्हणून ओरड सुरू आहे, पण शासनाने दूध संघांवर विविध बंधने घातली आहेत. सर्वसामान्यांना आधार देणारा संघ चालला तरच तुम्ही आम्ही तरणार आहोत. दूध व्यवसायामध्ये आलेल्या संकटातून अनेक दूध संघ उद्ध्वस्त झाले, पण गोकुळ मात्र टिकला याची कारणे टीकाकारांनी जाणून घेतली का? २००४-०५ मध्ये अशाच प्रकारे संघाला बदनाम करण्याचे कारस्थान रचले होते, पण सभासदांच्या ताकदीमुळे हे कारस्थान उधळले होते.
भैरवनाथ खांडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मेळाव्यास दत्तात्रय पाटील, साताप्पा साठे, शाहीर शशिकांत जाधव, मधुकर करडे, विलास डावरे, माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, बबन शिंत्रे, एकनाथ कमळकर, भिकाजी पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.गाडीबद्दल आत्ताच का बोलता ?सतेज पाटील गोकुळ संचालकांच्या गाडीबाबत बोलत आहेत, तुम्ही आमच्याबरोबर सत्तेत होता त्यावेळी तुमचे संचालक या गाड्यातून फिरत होते ना? मग त्यावेळी तुम्ही गाड्या का नाकारल्या नाहीत; आत्ताच या गाड्यांबाबत का बोलत आहात, असा प्रश्नही रणजितसिंह पाटील यांनी उपस्थित केला.