लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपला पोटशूळ उठला आहे. त्यातूनच रोज एका मंत्र्यावर आरोप करत सुटले असून, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर या द्वेषातून किरीट सोमय्यांनी आरोप केले आहेत, त्याचा निषेध करतो. राजकारणातील ३०-४० वर्षे सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले, त्यांच्यावर सवंग लोकप्रियता व भाजप प्रदेशाध्यक्षांना बरे वाटावे म्हणून कोणी बदनामी करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, बाजार समितीचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील व जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील, संचालक आर. के. पोवार यांनी दिला.
कागलच्या जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली उभी हयात घालवली. पक्ष देईल त्या खात्याचा वापर सामान्य माणसासाठी कसा करता येईल, हेच त्यांनी आतापर्यंत पाहिले. कागल, उत्तूर परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य देण्यासाठी त्यांनी संताजी घोरपडे कारखान्याची उभारणी केली. हजारो शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे या कारखान्याच्या उभारणीत आहेत. मात्र, सत्ता गेल्याने सैरभैर झालेल्या काही मंडळींनी किरीट सोमय्या यांचे कान भरून आरोप करायला लावले. यातून काहीही निष्पन्न होणार नाही, हे निश्चित आहे.
ग्रामविकास विभागाच्या वतीने त्यांनी गेल्या दीड वर्षात गावे, वाड्यावस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे. अशा कर्तबगार व जनतेची कणव असणाऱ्या नेत्यावर कोणी चिखलफेक करीत असेल तर कोल्हापूरची जनता कदापि सहन करणार नसल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.