कोल्हापूर: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असताना सरकार पंचनामे करीत आहे. ही सोंगे बंद करून तत्काळ प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मंगळवारी दुपारी रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून भरपाईची मागणी केली.अतिवृष्टीमुळे राज्यभर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकरी पूर्णपणे मोडून पडला आहे. वर्षभराच्या बेगमीचे धान्य कुजून गेल्याने तो हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत त्याला उभे राहण्यासाठी थेट आर्थिक मदतीची गरज आहे; पण शासनस्तरावर पंचनामे सुरू केले आहेत. याला विलंब लागणार असल्याचे तातडीने मदत द्यावी म्हणून संभाची ब्रिगेडने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी कोल्हापुरात आंदोलन झाले.
निदर्शने करून सरसकट ५० हजार द्या, पीक विमा रक्कम खात्यात जमा करा, अशा मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. आंदोलनात अभिजित भोसले, नीलेश सुतार, विकी जाधव, अभिजित कांजर, शिवाजी गुरव, उमेश जाधव, सच्चिदानंद गुरव, अमरसिंह पाटील, अविनाश आंबी, हरीश कारंडे, सचिन नालंग, राकेश जाधव यांनी सहभाग घेतला.