कोपार्डे : कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या सभेत इथेनॉल प्रकल्पाला सभासदांनी विरोध नोंदवूनही संचालक मंडळाने २२ कोटींच्या इथेनॉल प्रकल्पाला सभेत मंजुरी दिली आहे. यामुळे सभासदांची दिशाभूल होत असून, हा इथेनॉल प्रकल्प थांबवावा, अशी मागणी विरोधी शाहू आघाडीच्या वतीने कुंभीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक रमेश बारडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निवेदनात म्हटले आहे की, कुंभी -कासारी कारखान्याने कर्मचाऱ्यांचा एक वर्षाचा पगार थकविला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांच्याकडून घेतलेली कोट्यवधींची कर्जे व त्यापोटी द्यावे लागणारे दिवसाला १३ लाख रुपये व्याज यामुळे कारखाना कर्जाच्या खाईत गेला आहे. व्यापाऱ्यांची देणी, तोडणी वाहतूक बिले थकली आहेत. अशातच २२ कोटी रुपयांचा नवीन इथेनॉल प्रकल्प ऑनलाइन सभेचा आधार घेऊन विद्यमान संचालक मंडळाने आपल्या स्वार्थासाठी मंजूर करून घेतला आहे. याला सभासदांचा विरोध असूनही न जुमानता तो मंजूर केला आहे. ऑफलाइन सभेेत यावर चर्चा करूनच इथेनॉल प्रकल्पाला मंजुरी घ्यावी अशी चर्चा झाली असताना हा प्रकल्प सभासद शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा आरोप शाहू आघाडीच्या वतीने करण्यात आला.
फोटो : १७ कुंभी कारखाना निवेदन
कुडित्रे, ता. करवीर येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यावर होणारा इथेनॉल प्रकल्प थांबवावा, अशी मागणी संभाजी पाटील, एकनाथ पाटील यांनी साखर सहसंचालक कार्यालयीन अधीक्षक रमेश बारडे यांच्याकडे केली.