कोल्हापूर : ‘गोकुळ’शी जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादक शेतकरी जोडले आहेत. राजकीय द्वेषातून चुकीचे आरोप करून संघाची बदनामी करण्याचे उद्योग कोणी करू नयेत. कोणाला आमच्या कारभाराबद्दल शंका असतील तर कोणत्याही समितीच्या चौकशीस तयार आहोत, असा पलटवार ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
गाय दूध खरेदी दरातील कपातीबरोबर विविध प्रश्नांबाबत सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’ला निवेदन देऊन टीका केली होती. पाटील यांच्या निवेदनातील मुद्दे खोडून काढत अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, तीन लाख लिटर गायीचे अतिरिक्त दूध असून त्याची पावडर केली तर प्रतिलिटर ९.७१ रुपये तोटा सहन करावा लागत आहे.
सध्या हजारो टन पावडर संघाकडे पडून असल्याने दोनशे कोटी गुंतून पडले आहे. संघ अडचणीत आला तर पर्यायाने त्याची झळ शेतकºयांनाच बसणार आहे. ‘गोकुळ’च्या म्हैस दुधाने गुणवत्तेच्या बळावर बाजारपेठेत दबदबा निर्माण केला आहे. फुल क्रीम म्हैस दुधाचे ६.५ फॅट असते, त्यात गायीचे ४.२ फॅटचे दूध मिसळणे अशक्य असल्याने आरोप करून बाजारपेठेत संभ्रम निर्माण करू नयेत. राजकीय स्वार्थासाठी सहा लाख शेतकरी अडचणीत येतील, असे उद्योग बंद करावेत, असेही अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.तरीही दंगा असता!सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना लेखी उत्तरे दिली आहेत. विभागीय सभांमधून संस्थांच्या बहुतांशी प्रश्नांचे निराकरण केले जाते तरीही या सभेत प्रश्नोत्तरे झाली असती तरीही काही मंडळींनी दंगा केलाच असता, असे रवींद्र आपटे यांनी सांगितले.बसपाळीने नुकसानअतिरिक्त दुधामुळे नाइलाजास्तव दोन रुपये दरकपात केल्याने रोज १४ लाखांचा फटका उत्पादकांना बसतो, याची कल्पना आम्हाला आहे; पण तसे केले नसते तर इतर संघांप्रमाणे बसपाळी (महिन्यातील काही दिवस संकलन बंद) घेतली तर शेतकºयांचा रोज ७५ लाखांचा तोटा होणार आहे. त्यामुळे बसपाळीसारखा निर्णय आम्ही घेणार नसल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.