कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळात सरकारच्या नियमावलीला राज्यातील सुमारे १५ हजार मोबाइल रिटेलर्सनीही प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवले आहेत; परंतु या काळात विदेशी ई-काॅमर्स कंपन्या शासनाचे नियम न पाळता इतर वस्तूंची राजरोसपणे विक्री करीत आहेत. या कंपन्यांच्या नियमबाह्य प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी नियमांचा भंग करणाऱ्या या कंपन्यांंवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
लाॅकडाऊन काळात विविध समस्या मांडण्यासाठी असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, असोसिएशनने केलेल्या मागणीबाबत सरकार सकारात्मक विचार करेल. व्यापारी वर्गाला दिलासा देणारे निर्णय घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. लवकरच याबाबत स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्याची कार्यवाही केली जाईल. येत्या काळात जास्तीत जास्त मोबाइल रिटेलर्सबरोबर झूम मीटिंगद्वारे संवाद साधायला आवडेल. यावेळी असाेसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलाश लखयानी, राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदर खुराणा, राष्ट्रीय सरचिटणीस भावेश सोळंकी, सहसचिव नवनीत पाठक, असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप, सरचिटणीस जुझेर ढोरजीवाला सहभागी झाले होते.
मागण्या अशा,
मोबाइल व्यावसायिक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. दुकाने बंद असल्याने वीज बिलांच्या स्थिर आकारात सवलत द्यावी. ई-काॅमर्स कंपन्यांना अवैध विक्री करण्यासपासून रोखावे.
कोट
राज्यात कडक लाॅकडाऊन असताना अनेक विदेशी कंपन्या मोबाइलसह इतर वस्तू सर्रास विक्री करीत आहेत. त्यांच्यामुळे रिटेलर्सचे मोठे नुकसान होत आहे. रिटेलर्स प्रामाणिकपणे नियम पाळत आहेत. त्यामुळे अशा विदेशी कंपन्यांवर कडक कारवाई करावी.
-विभूती प्रसाद,
वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशन