कोल्हापूर : डाव्या आघाडीचे ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्यावर सोमवारी सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर कोल्हापूर शहरवासियांनी सर्व व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. मध्यवर्ती बस स्थानकावर फेरीवाले संघटनेने हल्लेखोरांना लवकर ताब्यात घ्यावे, अशी मागणी करीत दुपारी दीड वाजता काही काळ रास्ता रोको केला. पानसरे यांच्यावरील हल्ल्याची बातमी सोशल मीडियामुळे कांही मिनिटांतच संपूर्ण शहराबरोबर राज्यातही कळाली. त्यामुळे शहरातील नागरिकात उलट-सुलट चर्चा सुरूझाली. प्रत्येकजण सत्यता पडताळण्याचा प्रयत्न करीत होता. हल्याच्या वृत्ताची खात्री झाल्यानंतर कार्यकर्ते हॉस्पिटलजवळ जमू लागले. तसतसे शहरातील वातावरण तंग बनत गेले. हल्ल्याच्या निषेधार्थ कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते मोटारसायकलवरून बंदचे आवाहन करत होते. या कार्यकर्त्यांनी प्रथम प्रतिभानगर, शाहू पुतळा चौक, राजारामपुरी पेट्रोलपंप, राजारामपुरी मुख्य लेन, शाहूपुरी व्यापारी पेठ, मध्यवर्ती बसस्थानक, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी व्यापारी पेठ, बिंदू चौक, शिवाजी चौक, गुजरी, महाद्वार रोड, लक्ष्मी रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, पापाची तिकटी, आदी परिसरातून फेरी मारत व्यवहार बंद करण्याचे आवाहन केले. ‘बंद’च्या आवाहनाला प्रतिसाद देत काही दुकाने बंद झाली, तर महाद्वार रोडवरील एका हॉटेलच्या बाहेर ठेवलेल्या शीतपेयांच्या बाटल्या फोडण्यात आल्या. त्यामुळे जी काही दुकाने अर्धवट उघडू होती, ती सर्व पटापट बंद झाली. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील फेरीवाले संघटनेने काही काळ रास्ता रोको केला. अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे या परिसरातील वाहतूक कोलमडली होती. सर्व व्यवहार बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले. या परिसरात वातावरण तंग असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. स्ट्रायकिंग फोर्ससह राज्य राखीव दलाची एक कंपनी येथे तैनात होती.‘गेट वेल सून अण्णा’रुग्णालयाबाहेर मान्यवरांसह कार्यकर्त्यांची गर्दीकोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याची बातमी समजताच अॅस्टर आधार हॉस्पिटल परिसरात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी ‘गेट वेल सून अण्णा’ म्हणत अलोट गर्दी केली. अण्णांनी ज्या कष्टकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, पुरोगामी विचारांसाठी लढा दिला, कार्यकर्त्यांना बळ दिले त्या प्रत्येक व्यक्तीला अण्णांची काळजी वाटत होती. एकीकडे डोळ्यात आलेल्या अश्रूंना रोखत अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस दुसरीकडे हल्लेखोरांबद्दलचा प्रचंड संताप यामुळे परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात होती. दुपारच्या सुमारास रुग्णालयाच्या आवारात पाय ठेवायलाही जागा नव्हती. येथे तिसऱ्या मजल्यावर अण्णांवर उपचार सुरू असून शहरातील प्रमुख व्यक्ती सोडले, तर अन्य कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता. अण्णांच्या तब्येतीची काहीच माहिती कळत नसल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट होते. सगळे एकमेकांना विचारून काही कळतंय का हे पाहत होते. अण्णांचा सहवास लाभलेले अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. सगळेच एकमेकांना धीर देत होते, हल्लेखोरांबद्दल निषेध व्यक्त करत होते, सामाजिक चळवळी करायच्याच नाहीत का? जे घडतंय ते सहन करायचे का? असा उद्विग्न प्रश्न मांडत होते. दाभोलकरांच्या हत्येनंतर आम्हाला भीती वाटलीच होती आज ती खरी ठरली, धमकीचे पत्र अण्णांनी मनावर घेतले नाही, असेही कार्यकर्ते म्हणत होते. या उत्स्फूर्त भावनांना आवरणे अशक्य होते तेव्हा संपतबापू पवारांनी उपस्थितांना शांतता राखण्याचे व परिसरातून गर्दी कमी करण्याचे आवाहन केले. सगळे लोक आज अण्णांनी या हल्ल्याशी लढावे आणि त्यातून सुखरूप बाहेर पडावे, अशी प्रार्थना करत होते. जयसिंगराव पवारांनाही धमकीचे पत्रपानसरे यांनी आलेली धमक्यांच्या पत्रांना फारसे गांभीर्याने घेतले नाही. अशीच पत्रे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनाही आली असल्याची माहिती त्यांच्या कन्या डॉ. मंजुश्री पवार यांनी दिली.मंजुश्री पवार व मेघा पानसरे यांच्यात अत्यंत सलोख्याचे संबंध. पानसरे-पवार कुटुंबीयांतही अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध. त्यामुळे पानसरे यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच डॉ. जयसिंगराव पवार,पत्नी वसुधा पवार, कन्या अरुंधती पवार, डॉ. रमेश जाधव यांनीही रुग्णालयात येऊन मेघा यांना धीर दिला. त्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना मंजुश्री पवार यांनी सांगितले की,‘पानसरे अण्णांनी जशी पत्रे आली होती तशीच काही पत्रे बाबांनाही (डॉ.जयसिंगराव पवार) यांना आली आहेत. त्यातील काही पत्रे आम्ही फाडून टाकली; परंतु एक पत्र मी जपून ठेवले आहे. ते कोल्हापुरातूनच आल्याचे पोस्टाच्या शिक्क्यावरून दिसते. त्यात आक्षेपार्ह अशा स्वरूपाचा मजकूर आहे. यासंबंधीची माहिती पोलिसांना देणार आहे.
कोल्हापुरात बंद, रास्ता रोको
By admin | Published: February 17, 2015 12:02 AM