कोल्हापूर : निकालांतील चुका, अर्ज जनरेट होण्यातील अडचणी, आदी स्वरूपातील परीक्षेतील गोंधळ थांबवा. या विभागाचे कामकाज कायद्याने करा, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्याकडे केली.विद्यापीठाच्या परीक्षाविषयक कामकाजाच्या सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ‘सुटा’च्या शिष्टमंडळाने डॉ. भोईटे यांची काल, मंगळवारी भेट घेतली. यावेळी पीआरएन नंबर, कोड टाकला, तरी अर्ज जनरेट होत नाही. निकालांमध्ये चुका झाल्या आहेत. काही विद्याशाखांचे निकाल लागलेले नाहीत. परीक्षा विभागाचा हा गोंधळ विद्यार्थी, प्राचार्य, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरत असल्याचे वास्तव शिष्टमंडळाने डॉ. भोईटेंसमोर मांडले. परीक्षा विभागातील काही कामकाज नियमबाह्ण, कायद्याने होत नसल्याचे उदाहरणे सादर केली. शुक्रवारी (दि. २७) होणाऱ्या अधिसभेच्या पार्श्वभूमीवर परीक्षाविषयक कामकाजाबाबतच्या प्रश्नांनादेखील समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याची तक्रारी केली. (प्रतिनिधी)
परीक्षा विभागातील गोंधळ थांबवा
By admin | Published: March 26, 2015 12:30 AM