कोल्हापूर : कोरोनाकाळात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता सीपीआरसह आरोग्यव्यवस्थेमध्ये काम करणारे डॉक्टर्स, परिचारिकांनी रुग्णसेवा केली आहे. तरी येथील परिचारिकांच्या बदलीसंदर्भात राज्य शासन अध्यादेश काढत असून, या बदल्या थांबवण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने जिल्हा प्रशासनाकडे केली.
एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे परिचारकांची बदली केली जात आहे. त्यामुळे आधीच आरोग्यव्यवस्थेवर ताण असताना राज्य सरकारची बदल्यांसंदर्भातील भूमिका काय आहे, हे समजून येत नाही. या परिचारकांना कोरोना भत्ता दिलेला नाही. सातव्या वेतन आयोगातील देय असणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यातील फरकही थकीत आहे. तरी
राज्य सरकारचा यासंदर्भातील नियोजित अध्यादेश मागे घेण्यात यावा; अन्यथा लोकशाही मार्गाने सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
निवेदन न घेतल्याने निषेध
निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने दालनात गेल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोरोना नियमांनुसार पाचच लोकांनी उपस्थित राहावे, असे सांगितले. यावरून त्यांच्यात व कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले नाही व वृत्तछायाचित्रकाराचा कॅमेरा काढून घेण्याची सूचना पाेलिसांना केली. याचा निषेध करत कार्यकर्त्यांना दालनाबाहेरच निवेदनाची प्रत चिकटवली.
---
फोटो नं १३०८२०२१-कोल-बीजेपी निवेदन
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व भाजप शिष्टमंडळात झालेल्या वादानंतर निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर चिकटवण्यात आली.
----