कोल्हापूर बांधकाम कामगारांची ऑनलाइन नोंदणी करताना ग्रामसेवकांची सही आणि शिक्का आवश्यक असतो. यासाठी अफेडेव्हिटची मागणी करीत असून, या माध्यमातून होणारी अडवणूक थांबवा, अशी मागणी परिवर्तन चळवळीच्या वतीने संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे.
बांधकाम कामगारांना ९० दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र, वरून आदेश नाहीत असे सांगून कामगारांची अडवणूक होत आहे. याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. शिष्टमंडळाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी अनिल कवाळे, संग्राम जाधव, प्रकाश पाटील, अभिजित सुतार, रियाजा ऐनापुरे, प्रकाश पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.