कोल्हापूर : खोटी आश्वासने देऊन आणि जनतेची फसवणूक करून केंद्र तसेच राज्यातील सरकार सत्तेवर आले परंतु या सरकारला महागाई कमी करणे, टोल रद्द करणे शक्य झाले नाही. त्यामुळे अशा खोटारड्या सरकारच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरावे आणि सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करावा, असे आवाहन सोमवारी दुपारी काँग्रेसच्या नेत्यांनी येथे केले. कोल्हापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवारी दुपारी साडेबारा ते दीड या वेळेत कळंबा टोलनाका येथे मोदी व फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा देत तासभर रास्ता रोको केला. या आंदोलनात सुमारे तीनशेहून अधिक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. सुमारे तासभर भरउन्हात आंदोलकांनी रस्ता रोको केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवावी लागली. रस्ता रोकोसाठी कोल्हापूर शहर, करवीर, राधानगरी, भुदरगड, चंदगडसह जिल्ह्णाच्या विविध भागांतून काँग्रेस कार्यकर्ते आले होते. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील, काँग्रेस निरीक्षक रमेश बागवे,माजी मंत्री सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी केले. सकाळी अकरा वाजल्यापासून कार्यकर्ते जमायला लागले. पुण्याहून रमेश बागवे कळंबा नाका येथे पोहोचताच रस्ताराको सुरू झाला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निरीक्षक बागवे यांनी मोदी व फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने दिली. टी.व्ही. समोर येऊन मोठ्या मोठ्या थापा मारल्या पण सत्तेत आल्यापासून जनतेला दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे. जमीन अधिग्रहण कायदा काँग्रेसने केला,परंतु तो रद्द करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा कायदा वटहुकुमाद्वारे आणला आहे. महागाई कमी करतो म्हणाले आणि आता रेशन दुकानांतूनही धान्य गायब झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढण्याची तयारी ठेवा.यावेळी पी.एन.पाटील यांचेही भाषण झाले. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) क्रीडा संकुलाचे उद्घाटन काँग्रेस कार्यकर्ते करणार क्रीडा संकुल कॉँग्रेस सरकारने मंजूर केले. त्यासाठी निधीचीही तरतूद केली. आता आम्हीच केले म्हणून भाजपवाले त्याचे उद्घाटन करतील. मुख्यमंत्री त्यासाठी कोल्हापुरात येणार आहेत. तोपर्यंत आत घुसून कॉँग्रेस कार्यकर्तेच त्याचे उद्घाटन करतील. युती शासनाने टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, पण ते त्यांनी पाळले नसल्याचे माजी मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
युती सरकारविरोधात रास्ता रोको
By admin | Published: February 09, 2015 11:40 PM