पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे महावितरणच्या वतीने वीज बिलांची सक्तीने वसुली व वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई त्वरित बंद करावी यासाठी शहर संघर्ष कृती समितीने महावितरण कार्यालयास कारवाई थांबविण्याचा इशारा दिला. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष अन्वर जमादार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
लॉकडाऊनच्या काळामध्ये ग्रामस्थांना रोजगार नसल्याने आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले आहे. या काळामधील वीज बिले थकीत आहेत. ही बिले माफ व्हावीत यासाठी अनेक पक्षसंघटना यांनी मागणी केली आहे. मात्र पट्टणकोडोली येथील महावितरणमार्फत अशा थकीत बिलांची वसुली सक्तीने सुरू असून वीज पुरवठाही खंडित केला जात आहे. ही बाब येथील कृती समितीच्या निदर्शनास येताच त्यांनी महावितरणच्या कार्यालयात भेट देऊन ही कारवाई थांबविण्याची मागणी केली. असे न झाल्यास पुढील संघर्षाला सर्वस्वी महावितरण जबाबदार असेल, अशा स्पष्ट शब्दांत कृती समितीच्या वतीने इशारा देण्यात आला. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष अन्वर जमादार, अनिल कांबळे, राजू आडके, ग्रामपंचायत सदस्य अंबर बनगे, मनसे शहरप्रमुख रवी आडके, प्रदीप मिरजकर, नंदकुमार गायकवाड, संतोष पटवर्धन, विठ्ठल गावडे, इतर सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.
१२ पट्टणकोडोली लाईट
फोटो ओळ : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे महावितरणतर्फे वीज बिलांची सक्तीची वसुली व वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई थांबविण्याची मागणी केली.