कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच ठेवल्यामुळे कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होत असल्याने असे रुग्ण घरी ठेवणे तातडीने बंद करा, अशी सूचना राज्याच्या कोरोनाबाबत नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी बुधवारी केली. दिवसभर या सदस्यांनी सीपीआर रुग्णालय, आयजीएम रुग्णालय इचलकरंजी येथे भेट दिली. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशीही चर्चा केली.
राज्याच्या आरोग्य विभागाचे माजी महासंचालक आणि टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे, नवले मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. डी. बी. कदम आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या प्रा. डॉ. आरती किणेकर यांनी सकाळी ११ वाजता सीपीआरला भेट दिली. सुमारे तीन तास या ठिकाणी त्यांनी माहिती घेतली आणि सूचना दिल्या. यानंतर इचलकरंजी येथील आयजीएमची पाहणी करून संध्याकाळी जिल्हाधिकारी देसाई यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील वाढत्या मृत्युदराबाबत त्यांचा अहवाल ते दोन दिवसांत देणार आहेत.
रुग्णांची वाढती संख्या पाहता पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था हाेत असेल तर त्यांना गृह अलगीकरणामध्ये ठेवले जात आहे. परंतु, घरामध्ये याविषयीची फारशी काळजी घेतली जात नसल्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यही पॉझिटिव्ह आल्याची अनेक उदाहरणे आहेत. यावरच चर्चा करीत हे सर्व रुग्ण रुग्णालयात दाखल झाले पाहिजेत, अशी स्पष्ट सूचना यावेळी करण्यात आली.
रुग्ण व्यवस्थापनाबाबत यावेळी अतिशय महत्त्वाचे बारकावे या तिघाही सदस्यांनी उपस्थितांना सांगितले. अन्य जिल्ह्यातील निरीक्षणे मांडून कोल्हापूरचा मृत्युदर कसा कमी करता येईल. त्यासाठी उपचार पद्धती, रेमडेसिविरचे उपयुक्तता, दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने काही नवे आजाराचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे डॉक्टर आणि नर्स यांचे सातत्याने प्रशिक्षण आवश्यक असल्याचे मतही या सदस्यांनी नोंदविले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी यावेळी जिल्ह्यातील कोरोनाविषयक स्थितीबाबत सादरीकरण केले. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. उल्साह मिसाळ, डॉ. विजय बरगे, डॉ. शिरीष शानबाग, डॉ. महेंद्र बनसोडे उपस्थित होते.
चौकट
अपुरे मनुष्यबळ
सध्याची कोरोना रुग्णांची संख्या पाहता या ठिकाणी मनुष्यबळ कमी असल्याचे या टास्क फोर्सच्या निदर्शनास आणून देण्यात आले. शासकीय रुग्णालये, तेथे दाखल होणारे रुग्ण या बाबींचा विचार करता तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
चौकट
ऑक्सिजन सिस्टर नेमा
प्रत्येक वॉर्डासाठी एक ऑक्सिजन सिस्टर नेमा अशी सुचना या सदस्यांनी केली. त्या वार्डातील रुग्णांना दिल्या जात असणाऱ्या ऑक्सिजनवरच या सिस्टर लक्ष ठेवतील. त्यामुळे ऑक्सिजन वाया जाणार नाही. अतिरिक्तही पुरवठा होणार नाही.
चौकट-
औषधांच्या पुरवठ्यातही सातत्य आवश्यक
मृत्युदर कमी करण्यासाठी आवश्यक औषधांचा सातत्यपूर्ण पुरवठाही आवश्यक असल्याने याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मृत्युदर कमी करण्यासाठी नॉन कोव्हिड रुग्णांसाठीही आयसीयुची व्यवस्था करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
कोट
जिल्ह्यात भेटी दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्युदर कमी करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचा आराखडा आम्ही तयार करणार आहोत. तातडीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला जाईल. किमान ४० टक्के मृत्यू टाळण्यासाठी सर्वांनाच काम करावे लागेल. यामध्ये सामूहिक कामगिरीच्या जोरावर यश मिळविता येईल.
डॉ. सुभाष साळुंखे,
प्रमुख, टास्क फोर्स
चौकट
आयजीएमला मनुष्यबळ पुरवा
इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयाला तातडीने प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक असल्याचे निरीक्षण या सदस्यांनी नोंदविले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही तशी कल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे आयजीएमसाठी तातडीने कोणत्या पदाचे किती मनुष्यबळ लागणार आहे याच यादी करण्यााचे काम हाती घेण्यात आले.
१२०५२०२१ कोल सीपीआर ०१
कोरोना टास्क फोर्सच्या सदस्यांनी डॉ. सुभाष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी येथील सीपीआरला भेट देऊन कोरोना स्थितीची माहिती घेतली. यावेळी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, डॉ. अनिल माळी यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.