कोल्हापूर : सर्वधर्म समभाव रुजवण्यासाठी व समाजामध्ये घडणाऱ्या अप्रिय घटना थांबविण्यासाठी सर्व धर्माच्या धर्मगुरूंची एक जिल्हास्तरीय समिती करावी, अल्पसंख्यांक कल्याण समिती लवकरात लवकर स्थापन करा, गावनिहाय धार्मिक प्रतिनिधींची समिती गठित करा, अशी मागणी विविध धर्मांतील नागरिकांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसीद्वारे झालेल्या विभागीय सर्वधर्मीय बैठकीत केली.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, वीर सेवा दलाचे अनिल गडकरी, भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे तय्यब कुरेशी, राजर्षी शाहू मुस्लीम वेल्फेअर फाउंडेशनचे महमद पठाण, मौलाना दस्तगीर मुल्ला, शौकत शिगावे, सिद्धगिरी संस्थान मठाचे कार्यकारी संचालक निखिल बारामतीकर, प्रथमेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कार्यकारी अभियंता सुयश पाटील, वीर महिला मंडळाच्या अर्चना मगदूम, दक्षिण भारत जैन सभेचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी दस्तगीर मुल्ला यांनी सर्वधर्मसमभाव रुजवण्यासाठी व सामाजिक तेढ थांबविण्यासाठी सर्व धर्मांच्या धर्मगुरूंची जिल्हास्तरीय समिती करावी, अशी मागणी केली. अनिल गडकरी यांनी जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समिती लवकरात लवकर स्थापन करावी, असे सांगितले. कुरेशी यांनी गावनिहाय धार्मिक प्रतिनिधींची समिती गठित करावी, अर्चना मगदूम यांनी अल्पसंख्यांकांच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत उपलब्ध करुन द्यावी, असे सांगितले.यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही केली जाईल असे सांगून, तसेच योजनांबाबतची माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा अल्पसंख्यांक कक्षाला दिल्या. जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांनी आभार मानले.
Kolhapur: धार्मिक तेढ थांबवा, धर्मगुरूंची समिती करा; विभागीय स्तरावरील सर्वधर्मीय बैठकीत नागरिकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 11:53 IST