इचलकरंजी : रविवार सुटी असूनही आधार कार्ड काढून देण्यासाठी येथील गावचावडीजवळचे महा ई सेवा केंद्र सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केंद्र चालू न ठेवल्यामुळे संतप्त नागरिकांनी सुमारे अर्धा तास रास्ता रोको केला. घटनास्थळी आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी आंदोलक महिला-पुरुषांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. विविध शासकीय योजनांतून मिळणारे अनुदान थेट बॅँक खात्यावर जमा होणार असल्याने बॅँक खात्याला, स्वयंपाकाचा गॅस व रेशनिंग कार्डाला आधार कार्ड जोडणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे आधार कार्ड काढून घेण्यासाठी महा ई सेवा केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. त्याप्रमाणे गेल्या आठवडाभर अधिक काळ येथील गावचावडीजवळील महा ई सेवा केंद्रावर आधार कार्डासाठी मोठी गर्दी होती. रविवारी सुटी असूनसुद्धा अनेक नागरिकांना आधार कार्ड काढून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे रविवारी सकाळी सात वाजल्यापासूनच या महा ई सेवा केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. रविवारी सकाळी साडेदहा वाजून गेले तरी केंद्र उघडले नसल्यामुळे नागरिकांत अस्वस्थता वाढू लागली. काही वेळाने अद्याप केंद्र उघडले जात नाही; पण केंद्र चालकाच्यावतीने कुणी तरी येऊन आधार कार्डाची इंटरनेट लाईन बंद असल्याचा फलक लावला. त्यामुळे आणखीनच संतप्त झालेल्या नागरिकांनी अचानकपणे रस्त्यावर जाऊन ठिय्या मारला. यावेळी केंद्रचालकाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलन स्थळापासून जवळच असलेल्या गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी आंदोलक महिलांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आंदोलकांना शांत केले. रविवारी केंद्रावर आलेल्या नागरिकांच्या कार्डाविषयी आज, सोमवारी केंद्र चालकाकडे चर्चा करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)विविध शासकीय योजनांचे अनुदान थेट बॅँक खात्यावर जमा होणार असल्याने स्वयंपाकाचा गॅस व रेशनिंग कार्डाला आधार कार्ड गरजेचे आहे.आधार कार्ड काढून घेण्यासाठी महा ई केंद्रावर गेल्या आठ दिवसांपासून सकाळी सात वाजल्यापासून गर्दी
इचलकरंजी येथे रास्ता रोको
By admin | Published: February 09, 2015 12:15 AM