आरक्षण आणि अन्य मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलनाची मशाल तेवत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी शिवाजीपेठेतील शिवाजी मंदिरामध्ये निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळी साडेदहा वाजतापर्यंत महाराणी ताराराणी चौकात समाज बांधव एकत्रित येतील. सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा यावेळेत आंदोलन करण्यात येईल. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठ, तावडे हॉटेल, स्टेशन रोड, धैर्यप्रसाद हॉलकडून या चौकाकडे येणारे मार्ग अडविण्यात येतील. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी या आंदोलनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मराठा समाजातील संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, तालीम संस्था आणि तरुण मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.
चौकट
आम्ही खासदार संभाजीराजे यांच्याबरोबर आहोत
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांच्या विरोधात आमची भूमिका नाही. त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. मराठा समाजासाठी ते राज्यभर, तर आम्ही कोल्हापूरमध्ये आंदोलन करत आहोत. समाजाच्या काही दुर्लक्षित राहिलेल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधणे आवश्यक असून, त्यासाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे सकल मराठा समाजाचे समन्वयक दिलीप देसाई यांनी सोमवारी सांगितले.