कोल्हापूर : राज्यातील दहा लाख ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या वेतनवाढीचा करार आणि कल्याणकारी महामंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत ऊसतोडणी सुरू केली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने आज, शुक्रवारी मोर्चाद्वारे दिला. जिल्ह्यातील ऊसतोडणी व वाहतूककामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता, त्यावेळी हा इशारा देण्यात आला. राज्यातील साखर कारखाने सुरू होत असतानाच कामगारांनी असा इशारा दिल्यामुळे यंदाही हंगाम सुुरू होण्यापूर्वीच अडचणी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील ऊसतोडणी, वाहतूक, बैलगाडीवान, मुकादमांच्या संघटनेने आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्ह्यातील संपाची सुरुवात केली. मोर्चा लक्ष्मीपुरी, कोंडा ओळ, व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यामध्ये मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. निदर्शनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात डॉ. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगले, प्रा. आर. एन. पाटील, दिनकर आदमापुरे, आदींचा समावेश होता. राज्य सरकार व राज्य साखर संघाने हा संप कामगारांवर लादला आहे. गेल्या हंगामाबरोबर ऊसतोडणी व वाहतुकीच्या दराबाबतच्या त्रिपक्षीय सामंजस्य कराराची मुदत संपली. महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने २०१४-१५ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच नवीन करार करावा यासाठी जून २०१४ मध्ये मागण्यांचे निवेदन आणि संपाची नोटीस दिली होती; परंतु सरकार व राज्य साखर संघ यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे संघटनेने साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. मुंबईत दोन बैठका झाल्या; परंतु अंतिम निर्णय झाला नाही, म्हणून ऊसतोडणी बंद करण्यात येत असल्याचे डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले.
..तर ऊसतोडणी बंद करणार
By admin | Published: November 01, 2014 12:35 AM