कोल्हापूर : कोल्हापूर महिलांसाठी असुरक्षित असल्याचे वक्तव्य करुन चित्रा वाघ यांनी कोल्हापूरची बदनामी केली. जिल्ह्यातील वीस लाख भगिनींचा हा अपमान आहे. आमचे कोल्हापूर सुरक्षितच आहे. त्यामुळे वाघ यांनी सहानुभूती मिळविण्यासाठी केलेली बदनामी थांबवावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.चित्रा वाघ यांच्या प्रचारसभेत झालेल्या कथित दगडफेक प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, सत्य बाहेर आणावे तसेच भाजपची जी मंडळी कोल्हापुरात प्रचाराला येतील, त्यांना जादा पोलीस बंदोबस्त द्या, अशा सूचना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिल्या असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
दगडफेक करणारे पंपावर की, कदमवाडीत पळून गेले तपासादगडफेक करणारे शिरोलीतील पंपावर गेले की, कदमवाडीत पळून गेले हेही तपासा. ज्या ठिकाणी सभा होती त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासा, अशा सूचनाही पोलीस अधीक्षकांना दिल्याचे पाटील म्हणाले.
कोल्हापूरला बदनाम करण्याचे षढयंत्र राजकारणाच्या, सत्तेच्या हव्यासापोटी दिल्लीत महाराष्ट्राला बदनाम केले. आता कोल्हापूरला राज्यात बदनाम करण्याचे भाजपच्या नेत्यांनी षढयंत्र रचले आहे. माझ्यावर वैयक्तीक टीका करा, आरोप करा, त्याला उत्तर देण्यास समर्थ आहे, असे पाटील म्हणाले.चंद्रकांत पाटील 'त्यांची' उणीव भरुन काढत आहेतकोल्हापूरकर पैसे घेऊन मतदान करतात, असा चंद्रकांत पाटील यांचा समज आहे. हा समजसुध्दा कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा अपमान करणारा आहे. ई. डी.कडे चौकशीची मागणी करणार, असे सांगत ते मतदारांना धमकावत आहेत, असा दावाही पाटील यांनी केला. महादेवराव महाडिक सध्या प्रचारात नसल्यामुळे चंद्रकांत पाटील त्यांची उणीव भरुन काढत असल्याचा टोमणाही पालकमंत्र्यांनी लगावला.