कोल्हापूर : शेतकऱ्यांचे शांततापूर्ण व न्याय्य आंदोलन दडपण्याचे बंद करा. आंदोलन करणारे शेतकरी व शेतकरी संघटनांच्या नेत्यांवरील सर्व खटले मागे घ्या, आदी विविध मागण्या भारतीय महिला फेडरेशनच्या कोल्हापूर शाखेने बुधवारी केल्या आहेत. याबाबत फेडरेशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुले पत्र लिहिले आहे.
शेतकरी संघटना सातत्याने कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार हमीभाव ठरविण्याची मागणी करीत आहेत. आपले सरकार शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून उलट शेतकरीविरोधी कायदे मंजूर करून त्यांना अधिक संकटात लोटत आहे. ते अतिशय खेदजनक आहे. कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे, अश्रुधूर सोडून शेतकऱ्यांचे आंदोलन कठोरपणे मोडून काढण्याच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध या पत्राद्वारे केला असल्याची माहिती फेडरेशनच्या कोल्हापूर शाखेच्या अध्यक्ष सुनीता अमृतसागर यांनी दिली. यावेळी सचिव स्नेहल कांबळे, डॉ. कविता वाळवेकर, उपाध्यक्ष शुभांगी पाटील, कविता साळवे उपस्थित होत्या.