संतोष भोसले किणी : पुणे-बंगळूरु महामार्गावरील किणी (ता. हातकंणगले) येथील टोलनाक्याची मुदत संपून सुध्दा टोल वसुली सुरूच ठेवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने किणी टोल नाक्यावर महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी टोलप्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर, टोल वसुली बंद करावी या मागणीचे निवेदन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांना दिले.पुणे-बंगळूरु महामार्गावरील किणी व तासवडे (जिल्हा सातारा) टोल नाक्याची मुदत संपली आहे. मात्र, सहापदरीकरणाचे कारण देत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने टोल वसुली सुरूच ठेवण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.आज, मंगळवार सकाळी बारा वाजता वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजु जाधव याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी टोलनाक्यावर टोल वसुली बंद झालीच पाहिजे, सहापदरीकरण झाले नाही तर टोल कशासाठी अशा घोषणाबाजी करत काळे कपडे परिधान करून डोळ्यावर काळी पट्टी, हातात तराजु घेऊन जवळपास दहा मिनिटे रस्ता रोको करण्यात आला. यानंतर आदी मागणीचे निवेदन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे आधिकारी महेश पाटोळे यांना देण्यात आले.यावेळी प्रवीण माने, नागेश चौगुले, फिरोज मुल्ला, वैभव हिरवे, नयन गायकवाड, अशोक पाटील, सरदार खाटीक, गणेश बुचडे, यांच्यासह वाहतूक सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनस्थळी पेठवडगाव पोलिस ठाण्याच्यावतीने जलद कृती दलाच्या तुकडीसह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कोल्हापूर: किणी टोलनाक्यावरील टोल वसुली बंद करा, 'मनवा'सेनेच्यावतीने महामार्ग रोको आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 5:12 PM