कोल्हापूर : हद्दवाढीस विरोध करणाऱ्या गावातील केएमटी बससेवा तत्काळ बंद करा अन्यथा १२ सप्टेंबरपासून एकही केएमटी बस बाहेर पडू देणार नाही. शास्त्रीनगरातील वर्कशॉपला टाळे ठोकले जाईल, असा इशारा शहर हद्दवाढ कृती समितीने बुधवारी महानगरपालिकेला दिला. शहरात राहून हद्दवाढीला विरोध करणाऱ्या आमदार, खासदार, मंत्री यांच्या घरातील पाणीपुरवठाही बंद करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सावित्रीबाई फुले, पंचगंगा रुग्णालय, आयसोलेशन रुग्णालय येथील सेवा, स्मशानभूमी, अग्निशमन सेवाही बंद कराव्यात, अशी आग्रही मागणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरली. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या करातून हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना सुविधा देण्याचे काहीच कारण नाही. या गावांतील सांडपाणी शहरात येते त्याच्या प्रक्रियावर पालिका खर्च करते हा खर्चही त्यांच्याकडून वसूल करावा, असेही काहींनी सूचविले.
हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्रशासक कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी ग्रामीण भागातील सुविधा बंद करण्याबाबत चर्चा केली. शास्त्रीय मानदंडाप्रमाणे दरडोई लागणारी जमीन शासनाने आम्हाला द्यावी, आम्हाला उभा विकास नको. हद्दवाढ होणे गरजेचे असताना प्रशासन ठोसपणे प्रस्ताव पाठवून राज्य शासनाला का पटवून देत नाही. ग्रामीण जनतेशी का संवाद साधत नाही, अशी विचारणाही करण्यात आली.
ग्रामीण भागातील तोट्यातील केएमटीची बस सेवा बंद करावी अशी मागणी यापूर्वी केली होती, तरीही ती बंद केली जात नसेल तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे सांगत ही बससेवा बंद नाही झाली तर १२ सप्टेंबरला यंत्रशाळेला टाळे ठोकले जाईल, असे बाबा इंदूलकर यांनी सांगितले. रमेश मोरे यांनी वैद्यकीय सुविधाही ग्रामीण जनतेसाठी बंद करा, असे सांगितले. यावेळी आर. के. पोवार, बाबा पार्टे, अनिल कदम, संदीप देसाई, दिलीप देसाई, किशोर घाडगे यांनी बाजू मांडली.
प्रधान सचिवांसमवेत चर्चा शक्य
हद्दवाढीबाबत शासनास प्रस्ताव पाठविला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होत आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याबरोबर एक बैठक घेऊन त्यांना हद्दवाढीबाबत माहिती देण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रशासक बलकवडे यांनी सांगितले. केएमटीसह अन्य सुविधा बंद करण्याबाबत संबंधित विभागाकडून माहिती मागविली आहे. केएमटी जेथे बंद करणे शक्य आहे, तेथे लवकर निर्णय घेतले जातील. परंतु वैद्यकीय सेवा बंद करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दोन रुट बंद करण्याची प्रक्रिया
केएमटीचे २२ पैकी दोन मार्ग बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अन्य मार्गावरील जमा-खर्चाची माहिती घेऊन त्यावर निर्णय घेतले जाईल, असे अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक टीना गवळी यांनी सांगितले.