शिरोली : कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. जर रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारायला जमत नसेल, तर सुप्रीम कंपनीने काम सोडून चालते व्हावे, असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने शशिकांत खवरे यांनी सुप्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. रस्त्याचे काम सुरू करावे आणि दर्जा सुधारावा म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शिरोली-सांगली फाटा जैन मंदिर येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले.कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम सुप्रीम कंपनीने दोन वर्षांत पूर्ण करायचे होते; पण तीन वर्षे उलटली तरी अद्याप पन्नास टक्के काम पूर्ण झालेले नाही. जे रस्त्याचे काम केले आहे, ते निकृष्ट दर्जाचे केले आहे, तर गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम बंद आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सोमवारी (दि. २२) दिले होते; पण आठ दिवसांत कोणतेही काम सुप्रीम कंपनीने सुरू केले नाही, म्हणून अखेर सोमवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. अपूर्ण रस्त्याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आजही रस्त्याचे काम अपुरे आहे. ड्रेनेजलाईन, संपूर्ण रस्त्यावरील पूल, मोहरी यांचे काम अजून अपूर्ण आहे, तर उर्वरित जो रस्ता केला आहे, त्याची लेवलच झालेली नाही. या रस्त्याचा दर्जा आणि पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास नेमले आहे; पण हा विभाग देखरेख करताना दिसतच नाही. त्यामुळे या रस्त्याला दर्जाच नाही.सुप्रीम कंपनीचे अधिकारी अशोक मोहिते यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ते म्हणाले, दोन दिवसांत रस्त्याचे काम सुरू होणार आहे. काम सुरू होताच रस्त्याच्या कामाबाबत ज्या त्रुटी आहेत, त्या पूर्ण करू. तसेच वाहनधारकांना त्रास होऊ नये म्हणून लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे आश्वासन यावेळी मोहिते यांनी दिले. या आंदोलनात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते शशिकांत खवरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील, जोतिराम पोर्लेकर, योगेश, सरदार मुल्ला, मुन्ना सनदे, उत्तम पाटील, राजू सुतार, महम्मद महात, मन्सूर नदाफ, दिलीप पाटील, दिलीप तेलवेकर, ईश्वर कोळी, सुरेश पाटील, महावीर गुमताज, राजू देसाई, अनिल कोळी, शिवाजी मोटे, संदीप घोरपडे, अभिजित पाटील, संजय सुतार, संतोष परब, सुधीर गावडे, अजिंक्य माने, कैलास नवले, बापू गुडे, गणेश जाधव, बाबासाहेब कांबळे, पप्पू नार्वेकर, वैभव केसरकर, शुभम आलाट, अभिजित खाडे, लखन बनसोडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होते. (वार्ताहर)जमत नसेल तर काम सोडा : शशिकांत खवरेकोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम सुप्रीम कंपनीने दोन वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र, अजून पन्नास टक्के बाकी आहे. कंपनीने केवळ आडमुठेपणामुळे प्रवाशांना आणि नागरिकांना वेठीस धरले आहे. अपुऱ्या रस्त्यामुळे वाहनधारक वैतागले आहेत. जर कंपनीला काम जमत नसेल, तर त्यांनी काम सोडून जावे, असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने हातकणंगले पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खवरे यांनी यावेळी दिला.
सांगली फाट्यावर रास्ता रोको
By admin | Published: December 01, 2015 12:31 AM