मुरगूड : शेतकरी हाच राष्ट्राचा पोशिंदा आहे. त्याला अग्रक्रम देऊनच देशामध्ये शासनाने विविध निर्णय घेतले पाहिजेत; पण त्यांचा अजिबात विचार न करता, शेतकऱ्याला नेस्तनाबूत करण्यासाठीच केंद्र सरकारने भूमिअधिग्रहण कायदा संसदेत आणला आहे. कृषिविरोधी धोरणाला शिवसेनेचा कायमच विरोध राहील. आम्ही सत्तेत असलो तरी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जमिनीवर आणू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला. शासनाच्या निषेधार्थ निपाणी-राधानगरी हा रस्ता मुरगूड येथे रोखून धरत प्रचंड घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या रास्ता रोको आंदोलनाने वाहतूक काही काळ ठप्प झाली. यावेळी विजय देवणे म्हणाले, ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सत्तेत आलेल्या मोदी सरकारने ब्रिटिशांपेक्षाही कडक कायदे करण्याचा सपाटा लावला आहे. आठ एकरांपेक्षा जास्त जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या उद्योगधंद्याच्या नावाखाली बड्याबड्या धेंडांना विनामोबदला देण्याचाच डाव सरकारचा आहे. मोजक्या उद्योजक व भांडवलदारांचे समर्थन जर हे सरकार करीत असेल, तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करून रान उठवेल. मंगळवार मुरगूडचा बाजार असल्याने वाहनांची, चालक, व्यापाऱ्यांची काहीवेळ तारांबळ उडाली. रास्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणीच सभा घेऊन भूमिअधिग्रहण कायद्यांच्या प्रतींची होळी करण्यात आली. कागल तालुकाप्रमुख अशोक पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, जिल्हा महिला संघटक सुषमा चव्हाण, धोंडिराम परीट, आदींनी मनोगत व्यक्त केली. आंदोलनामध्ये तालुका महिला संघटक शोभा पाटणकर, उपजिल्हा महिला संघटक विद्या गिरी, नागेश आसबे, चंद्रशेखर पाटील, धनाजी धामणकर, प्रभाकर कांबळे, सागर मोहिते, शशी जाधव, दिग्विजय पाटील, निवृत्ती पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)
शिवसेनेचा मुरगूडमध्ये रास्ता रोको
By admin | Published: March 03, 2015 9:16 PM