इचलकरंजी : येथील डॉ. आंबेडकर पुतळा चौकातील फिरते शौचालय हटविण्यासाठी मागणी करणारी सूचना नगरपालिका प्रशासनास देऊनसुद्धा शौचालयाची गाडी अन्यत्र हलविली नसल्याच्या निषेधार्थ नगरसेवक अब्राहम आवळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरप्रेमी संघटनांनी जोरदार निदर्शने करीत रास्ता रोको केला. घटनास्थळी आलेल्या आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार व पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी गाडी अन्यत्र हलविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.डॉ. आंबेडकर पुतळा चौकात ‘चिकन ६५’ चा गाडा आणि जवळच फिरत्या शौचालयाची गाडी उभी असल्यामुळे चौकातील पावित्र्य नष्ट होत आहे. तरी फेरीवाला गाडा आणि शौचालयाची गाडी काढून टाकण्यात यावी, अशी मागणी कॉँग्रेसचे नगरसेवक राहुल खंजिरे व आवळे यांनी नगरपालिकेच्या २८ फेब्रुवारीला झालेल्या सभेत केली होती. यावेळी नगरपालिका प्रशासनाने दोन्हीही गाड्या हटविण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. चौकातील ‘चिकन ६५’ ची फेरीवाला गाडी हटविण्यात आली. मात्र, शौचालयाची गाडी त्याच ठिकाणी उभी होती. म्हणून सभेतील आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नगरसेवक आवळे यांच्या नेतृत्वाखाली दहा ते बाराजणांच्या जमावाने आंबेडकर पुतळा चौकात प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.तेथून जवळच असलेली फिरत्या शौचालयाची गाडी ओढून आणून रस्त्यामध्ये आडवी करण्यात आली. तसेच कार्यकर्तेही रस्त्यात आडवे उभे राहिले आणि त्यांनी घोषणाबाजी करीत रस्त्यावरची वाहतूक रोखली. सुमारे अर्ध्या तासानंतर पोलिस निरीक्षक पवार व नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संगेवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. शौचालयाची गाडी चौकातून बाजूला हटवून अन्यत्र उभी केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. तर त्याठिकाणी असलेली गाडी तेथे शेजारीच असलेल्या रिकाम्या जागेत ढकलून उभी केली. (प्रतिनिधी)
फिरते शौचालयासाठी रास्ता रोको, मोर्चा
By admin | Published: March 07, 2017 12:55 AM