कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याच्या मजबुती व रुंदीकरणासाठी दहा कोटींचा निधी खासदार फंडातून मंजूर झाला आहे. गेले दोन महिने काम सुरू असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या एका सरीने हा रस्ता उखडला आहे. साईडपट्ट्यांत अवजड वाहने रुतत असल्याने किती कुमकुवत साईडपट्ट्या झाल्या आहेत याची पोलखोल होत आहे. त्यामुळे वाकरे फाटा येथे लोकांनी रास्ता रोको केला.कोल्हापूर-गगनबावडा या राज्यमार्गाची मोठी दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात चिखल व पाणी असलेले खड्डे, तर उन्हाळ्यात धूळ अंगावर झेलतच जनतेला यातून मार्गक्रमण करावे लागत होते. या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण व्हावे यासाठी जनतेतून मागणी होत होती. यातून शिंगणापूर फाटा ते भामटे या १४ कि.मी. रस्त्याच्या मजबुतीकरण व रुंदीकरणासाठी दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता पाच मीटर रुंदीचा आहे. त्याचे दोन मीटरने रुंदीकरण करून तो सात मीटर करणे, प्रथम बी.यु.एम., त्यानंतर कारपेट व सिलकोट असे रस्त्याचे मजबुतीकरण करून साईडपट्ट्या दोन्ही बाजंूनी करून रस्त्याच्या बाजूने नाले सफाई करणे असे या कामाचे स्वरूप आहे.पुणे येथील कंपनीने हे काम घेतले असून, याला दोन स्थानिक सबकॉन्ट्रॅक्टर आहेत. सध्या कोपार्डे येथून दोनवडे फाट्यापर्यंत कंत्राटदारांकडून काम सुरू आहे. यात प्राथमिक स्वरूपाचे बी.यु.एम. व रुंदीकरण सुरू आहे. मात्र, या कामात एवढी निकृष्टता आहे की, अवकाळी पावसाच्या एका सरीने केलेले रस्त्याचे काम उखडले आहे. यामुळे या कामाच्या दर्जाचा पंचनामा झाला आहे. गेले दोन दिवस उखडलेल्या रस्त्याच्या खडीवरून घसरून अनेक अपघात झाले आहेत. यात अनेक महिला व पुरुषही जखमी झाले आहेत. मंगळवारी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांच्या संयमाचा बांध सुटला व वाकरे फाट्यानजीक उत्स्फूर्त रास्ता रोको करीत या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी अशा घोषणा दिल्या. यात यशवंत बँकेचे अध्यक्ष प्रकाश देसाई, संचालक दिलीप खाडे, एस. एम. पाटील, बी. बी. पाटील, सुभाष पाटील (वाकरे), शरद जाधव (मनसे), शरद नलवडे (कुडित्रे), शिवाजी पाटील (खुपीरे), सागर पाटील (कोपार्डे), सागर शेलार (कुडित्रे), अक्षय पाटील, आदींचा समावेश होता. (वार्ताहर)
वाकरे फाटा येथे रास्ता रोको
By admin | Published: March 04, 2015 12:36 AM