यड्राव : येथील बेघर व गावठाण परिसरात अनियमित व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने संतप्त झालेल्या महिलांनी आज, सोमवारी रास्ता रोको केला. नंतर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व उपसरपंच नसल्याने सदस्यांना रोषास सामोरे जावे लागले. योग्य दाबाने व नियमित पाणीपुरवठ्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन महिलांना मिळाल्याने मोर्चाची सांगता झाली. नुकत्याच सुरू झालेल्या पाणी योजनेबाबत ग्रामस्थांतून तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत.येथील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेमधून सध्या पाणीपुरवठा होतो. गेल्या पाच दिवसांपासून बेघर व गावठाण परिसरात पाणीपुरवठा झाला नाही. यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागली होती. काल, रविवारी सायंकाळी बेघर परिसरात पाणीपुरवठा झाला; परंतु तो कमी दाबाने व अपुरा झाला. त्यापाठोपाठ आज, सोमवारीही उर्वरित गावठाणामध्ये अपुरा पाणीपुरवठा झाला. त्यामुळे महिला संतप्त झाल्या. महिला एकत्रित जमल्याने त्यांनी अल्फोन्सा स्कूलकडून येणाऱ्या मार्गावर मोकळ्या घागरी घेऊन एक तासभर रास्ता रोको केला. तेथून सर्वजण मिळून ग्रामपंचायत कार्यालयाकडे मोर्चाने आल्या. त्या ठिकाणी सरपंच व उपसरपंच नसल्याने उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य रंगराव कांबळे, अर्जुन आदमाने व ग्रामविकास अधिकारी जी. डी. आदलिंग यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला व ठोस कृती झाल्याशिवाय येथून हलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मिळाल्याने महिलांनी मोर्चाची सांगता केली. पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत असल्याने पाणी योजनेच्या कामाबाबत ग्रामस्थांमधून तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत. मोर्चामध्ये रोशन मिरजकर, विमल डोके, नजमा सय्यद, शांताबाई शेळके, नंदा कांबळे यांच्यासह ५०हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)
यड्रावमध्ये पाण्यासाठी रास्ता रोको
By admin | Published: December 30, 2014 12:02 AM