आजरा : आजरा शहरात मंजुरीपूर्वी अॅडव्हान्समध्ये सुरू असलेली गटरसह अन्य विकासकामे तातडीने थांबवावीत व नगरपंचायतीच्या गाळ्यांचे वर्गीकरण करून स्क्वेअर फुटावर भाडे आकारणी करावी, अशी मागणी नगरपंचायतीच्या मासिक सभेत नगरसेवकांनी केली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या.
मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी स्वागत केले. विषयपत्रिका वाचन संजय यादव यांनी केले.
आजरा नगरपंचायतीचे मुख्य इमारत, जनता मार्केट, हनुमान संकुल, भाजी मंडई, विद्याधन कॉम्प्लेक्स या ठिकाणी १२६ दुकानगाळे आहेत. सदरच्या गाळ्यांची भाडेवाढ ५ वर्षांपूर्वी केलेली आहे. त्यामुळे नवीन भाडेवाढ करावी, असा विषय सभेसमोर प्रशासनाने आणला. यावर शुभदा जोशी यांनी आतापर्यंत गाळ्यांचे भाडे किती जमा झाले व ते पैसे कुठे आहेत असा प्रश्न केला.
नगरपालिका फंडात गाळ्यांचे १४ लाख ४४ हजार जमा असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. सरसकट गाळ्यांचे भाडेवाढ नको तर गाळ्यांचे वर्गीकरण करा आणि वर्गीकरणानंतर स्क्वेअर फूट याप्रमाणे भाडेवाढ केली जावी, अशी नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी मागणी केली. गाळे भाडेवाढीसाठी अधिकारी व नगरसेवक यांची संयुक्त कमिटी करून त्यामध्ये भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेतला जावा असेही शिंपी यांनी सूचविले.
आठवडी बाजार करवसुलीसाठी निविदेला प्रतिसाद मिळत नाही, असे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. विशिष्ट बँकेत खाते काढल्यानंतर संगणक देणार, कच-यासाठी बादल्या देणार असे सांगितले होते, त्याचे काय झाले असा प्रश्न संभाजी पाटील यांनी केला.
एसटी स्टँडशेजारी नाईक गल्लीत ग्रामपंचायतीचे गाळे बांधण्याला नगरसेविका रेश्मा सोनेखान यांनी विरोध केला.
आजरा शहरात मंजुरीपूर्वी अॅडव्हान्स कामे सुरू आहेत ती तातडीने थांबवावीत, अशी मागणी संभाजी पाटील यांनी केली. ग्रामपंचायत काळातील बिले गेली तीन वर्षे दिली जात आहेत व आता केली जाणारी मंजुरी पूर्वीच्या कामांचे बिल पुढील पाच वर्षांत देणार काय? असा सवाल अस्मिता जाधव यांनी केला. प्रत्येक सदस्यांना मिळालेल्या निधीप्रमाणे विकासकामे वाटून द्यावीत.
गेली तीन वर्षे आमच्या प्रभागात विकासकामे झाले नाहीत, असा आरोप संजीवनी सावंत यांनी केला. सभेस विलास नाईक, संभाजी पाटील, अभिषेक शिंपी, आलम नाईकवाडे, रेश्मा सोनेखान, यासिराबी लमतुरे, स्मिता पवार, संजीवनी सावंत, यास्मिन बुढ्ढेखान, अस्मिता जाधव, शुभदा जोशी व अधिकारी उपस्थित होते.