रुकडी : पंचगंगा साखर कारखान्याच्या पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन बदलून देण्यास चालढकल केल्याच्या निषेधार्थ हेरले (ता. हातकणंगले) येथे शेतकऱ्यांनी व कारखाना प्रशासनाने कोल्हापूर- सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम बंद पाडले. पाईपलाईन बदलून मिळत नाही तोपर्यंत काम चालू न देण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील गणेश पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन ठेकेदाराने बदलून दिली आहे. मात्र, पंचगंगा साखर कारखान्याच्या पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन बदलून न देता चौपदरीकरणाचा घाट ठेकेदाराने घातला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनाच बंद पडण्याचा मार्गावर असून, या योजनेवरील ५०० एकर जमिनींवरील ऊसपीक धोक्यात येणार आहे. परिणामी पाईपलाईन बदलून देण्याची वारंवार मागणी करूनही त्याची अद्याप पूर्तता न झाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.पंचगंगा साखर कारखान्याचे संस्थापक कै. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी शासनाची कोणतीही मदत न घेता कारखाना व शेतकऱ्यांच्या मदतीने १९६८ साली ८०० एकरची पाणीपुरवठा योजना राबविली. या योजनेची पाईपलाईन कोल्हापूर-सांगली रस्ता पार करते. त्यासाठी कारखान्याने सर्व शासकीय परवाने घेतले होते. ही पाईपलाईन बदलून देण्यासाठी कारखाना प्रशासनाने सप्टेंबर २०१३ पासून आजअखेर जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सातवेळा पत्रव्यवहार केला. याबाबत पाठपुरावा करूनही त्यास संबंधितांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.कोल्हापूर-सांगली रस्त्याचे सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीकडून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम करताना पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनवरील भराव काढला आहे. ही पाईपलाईन बदलण्यासाठी रक्कमही मंजूर झाली आहे. याबाबतची कल्पना व माहिती सुप्रीम कन्स्ट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम खात्याला कारखाना प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी ठेकेदार ही पाईपलाईन न बदलता त्यावर भराव टाकत होता. यावेळी शेतकरी व कारखान्याच्या कामगारांनी यास हरकत घेऊन हे काम रोखले. (वार्ताहर)पाईपलाईन बदलणार : पाटोळेसुप्रीम कन्स्ट्रक्शनचे अभियंता पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ही पाईपलाईन बदलायची आहे. मात्र, त्याचे साहित्य अद्याप आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता वेदपाठक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
चौपदरीकरणाचे काम रोखले
By admin | Published: May 19, 2015 11:50 PM