लोकमत न्यूज नेटवर्क
शिरगाव : शिरगाव - आमजाई व्हरवडे ( ता. राधानगरी ) येथील भोगावती नदीवरील नवीन पुलाची उंची कमी असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, पंचायत समितीचे माजी सभापती दीपाली दीपक पाटील व शिरगाव, आमजाई व्हरवडे, आवळी बुद्रुक या गावांतील प्रमुख नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत पुलाची उंची वाढत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी पुलासाठी मंजुरी दिली होती. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठा गाजावाजा करून या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर कामात गती आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले सात महिने काम बंद होते. परंतु गेला महिनाभर पुलाचे काम जोरात सुरू आहे. परंतु या पुलाच्या उंचीसंदर्भात परिसरातील ग्रामस्थांना माहिती मिळाल्याने त्यांनी पांडुरंग भांदीगरे, दीपाली दीपक पाटील यांच्यासह शिरगावच्या सरपंच रूपाली राजेंद्र व्हरकट , उपसरपंच संजीवनी राजेंद्र पाटील, माजी उपसरपंच सात्ताप्पा पाटील, आवळी बुद्रुकचे सरपंच डॉक्टर सर्जेराव कवडे, आमजाई व्हरवडेचे ग्रामपंचायत सदस्य सचिन सुतार, राजेंद्र व्हरकट, शिरगावचे ग्रामपंचायत सदस्य दिनकर चरापले, रवी कांबळे, शरद कांबळे, बाबूराव व्हरकट, दत्तात्रय व्हरकट, अशोक पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, शाखा अभियंता प्रवीण कदम व पाटील यांनी, सदर धरणाचे काम हे मुंबईमधील संकल्प चित्र मंडळ रेखाटन विभागाकडून मंजूर डिझाईननुसार सुरू असून हे काम मार्च महिन्यात पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
फोटो : शिरगाव - आमजाई व्हरवडेदरम्यान भोगावती नदीवरील नवीन पुलाची उंची कमी होत असल्याचे निदर्शनास आल्याने अधिकारी वर्गाला समजून सांगताना जि. प. सदस्य पांडुरंग भांदिगरे, दीपक पाटील, राजेंद्र व्हरकट, सात्ताप्पा पाटील, राजेंद्र पाटील, दिनकर चरापले आदी उपस्थित होते.