कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीस विरोध करणाऱ्या आसपासच्या गावातील बस सेवा बंद केली जात नाही, म्हणून सोमवारी पहाटेपासून सर्व पक्षीय कृती समितीने केएमटीची संपूर्ण बस सेवाच बंद पाडली. पहाटे पाच वाजल्यापासून बुद्ध गार्डन येथील वर्कशॉपमधून केएमटीची एकही बस मार्गावर सोडण्यात आलेली नाही.
शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातील जे मार्ग तोट्यात आहेत, ते तात्काळ बंद करावेत, हद्दवाढीला विरोध केला जात असताना शहरवासीयांच्या करातून गावांना बस सेवा देऊ नये, अशी आग्रही मागणी कोल्हापूर शहर सर्व पक्षीय कृती समितीने केली होती. त्यानुसार केएमटी प्रशासनाने प्रक्रियाही सुरु केली आहे. २४ पैकी तीन मार्ग बंद करण्यात आले होते. परंतु कृती समितीने तोट्यातील सर्व मार्गावर तात्काळ बस सेवा बंद करावी, अशी मागणी केली होती.
सोमवारी पहाटे पाच वाजता कृती समितीचे पदाधिकारी बुध्दगार्डन येथील वर्कशॉपच्या गेटसमोर जमले, त्यांनी एकही बस बाहेर न सोडता आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराबरोबरच काही गावांची बस सेवा बंद झाली आहे. गणेशोत्सवानंतर शाळा, महाविद्यालये सुरु होत असतानाच बस सेवा बंद पाडली गेल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. चालक, वाहक, वाहतुक नियंत्रक डेपोतच थांबून आहेत.
केएमटीच्या अतिरीक्त वाहतुक व्यवस्थापक टीना गवळी, प्रकल्प अधिकारी पी. एन. गवळी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आंदोलकांशी चर्चा करत आहेत. परंतु वडणगे, शिरोली, कळंबा, पाचगांव यासह तोट्यातील मार्ग बंद करत नाहीत तोवर एकही बस बाहेर सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.