कोल्हापूर : हृदयविकाराचा रुग्ण समोर बसून बोलत आहे. त्याला डॉक्टर सूचना देत आहेत. एवढ्यात तो रुग्ण मान टाकतो. डॉक्टर चटदिशी खुर्चीवरून उठतात. त्याच्याजवळ जातात. हलकेच छातीवर ठोसे मारतात आणि रुग्ण पुन्हा शुद्धीत येतो. केवळ चार सेकंदात रुग्णाचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू होते. हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक यांच्या प्रसंगावधानामुळे एका रुग्णाचे प्राण वाचले.डॉ. आडनाईक यांच्या रुग्णालयातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनीही जनजागृतीसाठी हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केला आहे. बारा वर्षांपूर्वी या रुग्णाला पेसमेकर बसवण्यात आला होता. ते नियमित आडनाईक यांच्याकडे तपासणीसाठी येतात. दोन दिवसांपूर्वी चक्कर येत असल्याने ते आडनाईक यांच्याकडे आले होते. त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते.तपासणीनंतर त्यांचे हृदय ३५ टक्केच काम करत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे डॉक्टर सांगत होते. एवढ्यात समोरच्या खुर्चीत बसलेल्या रुग्णाने मान टाकली. हे पाहताच डॉ. आडनाईक यांनी धाव घेतली आणि त्यांच्या छातीवर हळुवार ठोसे लगावले. चारच सेकंदात बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू झाले. रुग्ण ठीक झाला. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पुन्हा तात्पुरता पेसमेकर बसवण्यात आला.
अशा पद्धतीने हृदय बंद पडणे हे कधीही कोणाच्याही बाबतीत घडू शकते. अशावेळी कोणताही विचार न करता उपस्थित असणाऱ्या कोणीही संबंधित व्यक्तीच्या छातीवर हळुवार ठोसे लगावल्यास बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू होऊ शकते. परंतु हा प्रतिसाद चार सेकंदातच देण्याची गरज आहे. म्हणूनच माझ्याच रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज जनजागृतीसाठी शेअर केला आहे. - डॉ. अर्जुन आडनाईक