कोल्हापूर : येत्या १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पुणे-हुबळी वंदे भारत रेल्वेलाकोल्हापूरचा थांबा देऊन कोल्हापूरची रेल्वेकडून बोळवण करण्यात आली आहे. याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, हुबळी, धारवाडच्या लोकप्रतिनिधींनीही कोल्हापूरच्या थांब्याला विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर-मुंबई ही स्वतंत्रच ‘वंदे भारत’ मिळविण्यासाठी कोल्हापूरकरांना कंबर कसावी लागणार आहे.कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू व्हावी यासाठी खासदार धनंजय महाडिक हे गेले वर्षभर प्रयत्न करत होते. त्यानुसार या नव्या एक्स्प्रेसला मंजुरी देऊन वेळापत्रकही तयार झाले. याच दरम्यान पुणे-हुबळी ही वंदे भारतही मंजूर झाली. अशातच रेल्वेच्या दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेगळीच शक्कल लढवली. या स्वतंत्र दोन गाड्या चालवण्यापेक्षा पुणे, हुबळी गाडीला कोल्हापूर थांबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वेळापत्रकही जाहीर करण्यात आले.दरम्यान, या वेळापत्रकामध्ये आठवड्यातून तीनवेळा ही एक्स्प्रेस कोल्हापूरला येणार आहे असा उल्लेख आहे. त्यानुसार खासदार धनंंजय महाडिक यांनीही समाज माध्यमांवर माहिती दिली; परंतु सकाळी ११ वाजता निघणारी ही गाडी कोल्हापुरात पावणेपाचला पोहोचणार आहे. जादा पैसे खर्च करूनही पावणेसहा तास कोल्हापूरला येण्यासाठी लागणार असतील आणि पूर्ण दिवस वाया जाणार असेल तर ही गाडी कोल्हापूरकरांच्या गैरसोयीची ठरणार आहे.दुसरीकडे हुबळी, धारवाडकरांनीही कोल्हापूर थांब्याला विरोध सुरू केला आहे. इतर एक्स्प्रेस दहा तासात हुबळीला येत असताना वंदे भारतला जादा पैसे मोजूनही दहा तास लागणार असतील तर त्याचा उपयोग काय अशी विचारणा होत आहे.
एकाच गाडीत भागवण्याचा प्रयत्नकोल्हापूरकरांना मुंबईसाठी वंदे भारत हवी आहे. त्याला कोणताही पर्याय असता कामा नये; परंतु रेल्वेचे दिल्लीतील वरिष्ठ अधिकारी दोन गाड्यांची मागणी एकातच भागवण्याच्या मानसिकतेत आहेत. एक तर पुण्यापर्यंत गाडी, गैरसोयीची वेळ आणि भाडेही जास्त. यातून ही गाडीच अव्यवहारिक ठरणार आहे.