गडहिंग्लज : दोन दिवसांतील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असून, चंदगड व आजऱ्याचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन ऑक्सिजनचा पुरेसा साठा करावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी केली आहे.
कोरी म्हणाले, गडहिंग्लज शहरासह चंदगड व आजरा तालुक्यात काही ठिकाणी कोविड काळजी केंद्रे सुरू आहेत. त्याठिकाणी अनेक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. पूरपरिस्थितीमुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास ऑक्सिजनवरील रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजसह तीनही तालुक्यांत पुरेसा ऑक्सिजनचा साठा करणे आवश्यक आहे. त्याच्या नियोजनासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधी व संबंधित यंत्रणेची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी कोरी यांनी केली आहे.