अनिल पाटील- मुरगूड -कासारी (ता. कागल) येथील दहा वर्षांपूर्वी जोमात उद्घाटन केलेल्या सदाहसन व्यायामशाळा लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे बंद अवस्थेतच आहे. ग्रामपंचायतीने मात्र नको असलेले साहित्य भरून त्या व्यायामशाळेला आपली स्टोअर रूमच बनविली आहे. तरुणांच्यासाठी आश्वासनरूपी व्यायामशाळा दहावर्षांपासून झाली नसल्याने तरुणांच्यात व ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.कागल तालुक्यातील डोंगराळ विभागात मोडणारे कासारी हे अंदाजे पाच हजार लोकसंख्या असणारे गाव. स्वर्गीय बाबासाहेब पाटील यांच्या अथक प्रयत्नातून अनेक तरुण मंडळांच्या माध्यमातून अनेक विविध यशस्वी उपक्रम राबविले गेले आहेत. तरुणांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी २२ जानेवारी २००६ रोजी भव्य अशा पद्धतीने तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व जि. प. सदस्य संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली या व्यायामशाळेचे उद्घाटन झाले. व्यायाम शाळेला नावही सदाहसन असे गुरु-शिष्याचे नाव दिल्याने लवकरच ही व्यायामशाळा सुरू होईल, अशीच अपेक्षा तरुणांमध्ये होती.उद्घाटनापासून आजअखेर या ठिकाणी अगदी एक रुपयाचेही साहित्य आणले गेले नाही. त्यामुळे जवळ जवळ दहा वर्षे ही व्यायामशाळा बंदच आहे. तरुण ग्रामपंचायतीपर्यंत जाऊन चौकशी करून साहित्य मिळावे, यासाठी धडपडत आहेत, पण त्याकडे लक्ष देतो कोण?या सर्वांवर कहर म्हणजे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेसाठी आणलेल्या पाईपच या व्यायामशाळेत भरून ठेवल्या आहेत. बाहेरच्या बाजूला व्यायामशाळेचा भला मोठा फलक तसेच उद्घाटनाची कोनशिलाही नजरेला पडते, पण आता मात्र स्टोअररुम. ‘सरड्याची झेप कुंपणापर्यंत’ या उक्तीप्रमाणे तरुणांनी अनेकवेळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली, पण अद्यापही कोणाचेही लक्ष नाही. निवडणुका आल्या की, आश्वासनांची खैरात करणाऱ्या लोक प्रतिनिधींनी व्यायामशाळेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.गावामध्ये सुसज्ज व्यायामशाळा असलीच पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हेवेदाव्यानेच या व्यायामशाळेचा प्रश्न प्रलंबित आहे, पण ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे तगादा लावून मोठ्या प्रमाणात निधी आणून सदरची व्यायामशाळा सुरू करण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर करणार असल्याचे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश शिंदे यांनी सांगितले.
कासारीची व्यायामशाळा बनली स्टोअर रूम
By admin | Published: March 03, 2015 12:16 AM