उत्तूर - कोल्हापूर :( रवींद्र येसादे ) - अचानक आलेल्या जोराच्या वादळामुळे घरात वादळाचे वारे घुसले या वादळामुळे घराचे पत्र्याचे छप्पर उडून गेल्याने आर्दाळ ता.आजरा येथील सुमन बाजीराव जोशी विधवा महिलेचा राहण्याचा प्रश्न गंभीर बनला .
शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याने छप्पर उडुन गेले. सुमन जोशी या आपला अपंग जावई , मुलगी व २ नातु यांचेसह या घरामध्ये राहतात. मात्र या विधवा महिलेचा जावई नेताजी साठे हा एका हाताने अपंग आहे तर मुलगी चंद्रभागा ही बाळंतीण आहे, एक नातु ७वर्षाचा तर दुसरा ३ महिन्याचा आहे. सुमन जोशी यांचे हे कुटुंब अतिशय गरीब असुन ते मिळेल ती मोलमजुरी करुन आपली उपजीविका करतात.
सध्या कोरोना लॉकडाउनमुळे आधीच त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर असताना त्यांच्या राहत्या घराचे छप्परच गेल्याने त्यांच्यापुढे पुन्हा छप्पर कसे घालायचे त्यासाठी येणारा खर्च कसा करायचा हा खुप मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या कुटुंबाला मदतीचा हात देऊन त्यांच्या घरावर छप्पर उभे रहाणे गरजेचे आहे. अशा या हताश व निराधार गरीब कुटुंबाला घराचे छप्पर दुरुस्त करण्यासाठी समाजातील दानशुर व सेवाभावी वृत्तीने काम व्यक्तींनी पुढे येणे गरजेचे आहे.
या कुटुंबाला शक्य ती मदत करुन त्या कुटुंबाला आधार द्यावा असे आवाहन येथील सामाजीक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी केले आहे.
- सध्या हे कुटुंब छप्पर नसलेल्या घरातच राहत असुन वळीव पावसाला सुरवात झाल्यास लहान बाळाला घेऊन या कुटुंबाला उघड्यावरच रहावे लागणार असल्याने त्यांचे छप्पर तातडीने दुरुस्त व्हावे यासाठी शक्य तितक्या लवकर मदत मिळणे गरजेचे आहे.