कोल्हापूर - पंचगंगा नदीला आलेल्या पुरातील बचावकार्यात एक दृश्य अत्यंत बोलकं ठरलंय. सोशल मीडियावर तो व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. त्यामध्ये, सैन्य दलाने पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबीयाची सुखरुप सुटका केली होती. त्यावेळी, बोटीतून सुरक्षितस्थळी जात असताना बोटीतील महिलेला अश्रू अनावर झाल्याचं दिसलं. या महिलेनं देवाचा धावा केला. पण, यावेळी तिला देव भेटला होता तो पायात बुट घातलेला, अंगावर आर्मीचा ड्रेस परिधान केलेला अन् जीवाची बाजी लावणारा भारतीय सैनिक. त्या महिलेनं क्षणाचाही विचार न करता, बोटीतील जवानाचे पाय धरले. मनाला चटका लावून जाणारे हे दृश्य पाहून नेटीझन्स हळहळले. सैन्याच्या जवानानेही तितक्याच नम्रपणे अलगद आपला पाय पाठीमागे घेतला. जणू, ताई हे माझ कर्तव्यचं आहे, असंच काहीसं त्यांनी सूचवलं. मात्र, त्या माऊलीच्या डोळ्यातील पाणी, चेहऱ्यावरील भाव सारं काही सांगून जात होतं.
कोल्हापूरच्या चिखली गावाजवळील या महिलेनं नेमंक आपल्याला काय वाटलं होतं हे शब्दात सांगितलं आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगताना पुन्हा एकदा आर्मीच्या जवानांमुळेच आम्ही जिवंत असल्याचं सुजाता यांनी म्हटलं आहे. पाण्यातून बाहेर येतुय की नाही यामुळं आम्हाला भिती वाटत होती. आदल्यादिवशीच कळाल होतं की पलुसमध्ये बोट उलटी झालेलीय. अन् आमच्या बोटीमधी आमच्या घरची सगळी माणसं होती, लहान मुलं सगळी होती. त्यामुळे भिती वाटत होती. पाणी बघून कुणाला काय झालं तर काय करायचं ? त्यात मध्येच साप आला होता. आर्मीवाल्यांनी झटकन त्याला फेकून दिला. बोटमधी शिरला असता तर काय ? ही भिती होती मनात. आम्हास्नी वाट जायना झालती. पाणी सगळ बघून आम्हाला खूप भिती वाटत होती. आम्हाला त्यांनी सुखरुप बाहेर काढलं, त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. म्हणूनच आम्ही त्यांच्या पाया पडलो.
दोन दिवसांच्या पावसानंतर पाण्याची पातळी चांगलीच वाढली होती. चिखली गाव तर सगळ पाण्याखाली गेलं होतं. जनावरांचा जीव वाचवावा, का स्वत:चा असा प्रश्न लोकांपुढं पडला होता. घरातून निघताना जायचं की नको हा प्रश्न आमच्यापुढं होता. कारण, सगळचं, आम्ही जनावरं आणि घरातलं सगळच तिथं होतं. आमची एकदोन कुटुंब तिथ अडकली होती. पण, त्यांनाही वाचवायला कुणी जात नव्हतं. त्यामुळे, तीच परिस्थिती आपली झाली तर आपणही काहीच करु शकत नाही, हे लक्षात आल्यानं आम्हीही जायचं ठरवलं. मग, सगळ्यांना बाहेर काढलं, सगळ्यात शेवटी आम्ही बाहेर निघालो.
आता डोळे झाकल्यावरही फक्त आर्मीवालेच दिसतात, ते हायत म्हणून आम्ही हायत, अशा शब्दात सुजात आंबी या कोल्हापुरातील पूरग्रस्त महिलेनं जवानांच्या शौर्याला आणि धाडसाला वंदन केलं आहे. आर्मीतील जवानांच्या पाया पडून, आम्हाला वाचवणारा हाच खरा देव, अशी भावना सुजाता आंबी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोलून दाखवली.