कोल्हापूर : शहरातील बहुमजली इमारतीतील ‘एसटीपी’ प्लांट (जल शुद्धिकरण केंद्र) बंद आहेत. यामुळे दूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत कॉमन मॅन संघटनेच्यावतीने येथील क्षेत्र अधिकारी संजय मोरे व सुशील शिंदे या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.
यावेळी ते निरुत्तर झाले. यावर क्षेत्र अधिकाऱ्यांनी महापालिकेकडून अशा प्लांटची माहिती घेऊन तातडीने कार्यवाही करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.शहरात अनेक मोठे गृह प्रकल्प व बहुमजली इमारती आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स गठीत केले आहे. त्यात मोठ्या घरकुल योजनांना स्वत:चा एसटीपी प्लांट बसवून तो कायम कार्यान्वित करण्याची जबाबदारी संबंधित घरकुल योजनेवर निश्चित केली आहे.
शहरातील विशेषकरून ई वॉर्डमध्ये असे प्लांट बसविले आहेत. मात्र, ते कार्यान्वित असल्याचे भासविले जाते. प्रत्यक्षात ते कार्यान्वित नाहीत. विजेचे बिल अधिक येते, जास्त आवाज होतो, देशभाल दुरुस्तीचा खर्च अधिक आहे, अशा कारणांमुळे हे प्लांट बंद आहेत. परिणामी हे दूषित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळते. तेच प्रदूषित पाणी आम्ही पितो असे संघटनेचे अॅड. बाबा इंदुलकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात क्षेत्र अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.प्रत्येक सहा महिन्यांनी याचे नमुने घेऊन सरकारी प्रयोगशाळेत तपासण्याची तरतूद असताना असे होत नसल्याचेही इंदुलकर यांनी निदर्शनास आणून दिले. यावर असमाधानकारक उत्तरे देऊन टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी धारेवर धरत आजच कारवाई केल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यावर अधिकाऱ्यांनी प्लांटची माहिती घेऊन कार्यवाही करतो, असे लेखी आश्वासन दिले.शिष्टमंडळात अमित अतिग्रे, अविनाश दिंडे, शकील महात, चंद्रकांत ओतारी, सतीश नलवडे, संजय भोळे, शैलेश कळंबेकर, आदींचा समावेश होता.