कोल्हापूर : जागतिकीकरणाने सुविधा जरूर आणल्या. मात्र त्या उपभोगण्याची ताकद वंचितांमध्ये निर्माण करता आली नाही; कारण ही ताकद केवळ मूठभर लोकांपुरतीच मर्यादित झाली. हे चित्र बदलायचे असेल तर काही व्यवहार्य पर्याय द्यावे लागतील. त्यांची कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल; तरच गरिबी, सामाजिक असमानता दूर होईल, असे मत इंडियन सोशिआॅलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. आर. इंदिरा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित प्रा. डॉ. विलास संगवे स्मृती व्याख्यानमालेत त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ प्रा. डॉ. उत्तमराव भोईटे होते. प्रा. इंदिरा यांच्या व्याख्यानाचा विषय ‘भारतातील गरिबी, सामाजिक असमानता आणि अन्याय’ असा होता.
प्रा. इंदिरा म्हणाल्या, जागतिकीकरणाच्या घुसळणीत होणारी फरफट, तंत्रज्ञानामुळे आलेल्या भौतिक सुविधांमागे धावण्याची प्रवृत्ती आणि यासाठी राबविण्यात येणारी धोरणे यांमुळे सत्ता आणि संपत्तीचे केंद्रीकरण होत गेले. जागतिकीकरणामुळे समाजाचा मानवी चेहराच हरवला आहे. या प्रक्रियेत श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत, तर गरीब खोल गर्तेत ढकलला जात आहे. मानवी समाजाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत धोकादायक आहे.या कार्यक्रमास माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एन. पवार, आर. बी. पाटील, विभागप्रमुख प्रा. डॉ. जगन कराडे प्रमुख उपस्थित होते. प्रा. प्रल्हाद माने यांनी परिचय करून दिला. प्रतिभा पवार यांनी आभार मानले.