राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ‘गोकुळ’च्या दुधाला सध्या चांगलीच उकळी फुटली असून, शहकाटशहाचे राजकारणाने वेग घेतला आहे. एकमेकांचे डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू आहेतच, त्याचबरोबर छाननी वेळी उमेदवारी निकषाच्या आडून विरोधकांची कोंडी केली जाणार हे निश्चित आहे. पशुखाद्य व दूध पुरवठ्याची अटीसह पंचकमिटीत असल्याबाबतचा दाखला अनेकांना डोकेदुखी ठरणार आहे.
कोणत्याही परिस्थितीत ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर करायचे या इर्षेने विरोधी आघाडीने जोरदार तयारी केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा फार्म्युला ‘गोकुळ’मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. या आघाडीमुळे अनेकांची मतदारसंघात गोची होते, तरीही आघाडी म्हणून एकत्र आले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात सगळ्यांना एकत्र करत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्तारूढ गटाला हादरे दिले. मात्र मनाने एकत्र न आलेल्या विरोधकांकडे सत्तारूढ गटाचे नेते शांतपणे नजर ठेवून होते. चार दिवसांतच आघाडींतर्गत धुसफूस सुरू झाली आणि त्यातून माजी आमदार सत्यजित पाटील बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ आणखी दोघांना सोबत घेण्यासाठी सत्तारूढ गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
एकीकडे शहकाटशहाचे राजकारण सुरू असताना दुसऱ्या बाजूला छाननीची तयारी केली आहे. ‘गोकुळ’च्या उमेदवारीसाठी संघाने नियमावली तयारी केली आहे. त्यानुसारच छाननी होणार आहे. सत्तारूढ गटातील इच्छुकांनी त्यानुसारच गेली तीन-चार वर्षे तयारी केली आहे. मात्र विरोधी आघाडीकडून बहुतांशी नवीन चेहरे रिंगणात येणार आहेत. त्यातील किती जण उमेदवारीचे निकष पूर्ण करणार हे महत्त्वाचे आहे. उमेदवार ज्या दूध संस्थेचे प्रतिनिधित्व करत आहे, त्या संस्थेने ‘गोकुळ’ला वर्षाला किमान ४० हजार लिटर दूध पुरवठा केला पाहिजे. त्याचबरोबर नजीकचे सलग तीन वर्षे दहा टन प्रतिवर्षी पशुखाद्याची उचल करणे बंधनकारक आहे.
अनेक इच्छुकांचा दूध आणि संस्थेचा काहीही संबंध नसतो. निवडणुकीपुरता दुसऱ्या संस्थांचे ठराव आपल्या नावावर घेणे, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र याबाबतही निकष असून, उमेदवार हा त्या संस्थेच्या पंचकमिटीत असणे बंधनकारक आहे. अनेकजण तसे संबंधित संस्थेकडून दाखलेही घेतात. मात्र उमेदवार राहतो एका ठिकाणी आणि ठराव दुसऱ्या गावातीलच आहे. असा ठरावधारक त्या संस्थेचा सभासदच कसा होऊ शकतो? अशा अनेक गोष्टी समोर येणार आहेत.
‘गोकुळ’मार्फत पशुखाद्य व दूध पुरवठ्याचे दाखले दिले आहेत, त्याचवेळी संबंधितांचे रेकॉर्ड तयार झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, तर दिग्गजांना रिंगणाबाहेर रहावे लागेल.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कसोटी
‘गोकुळ’च्या पोटनियमाचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आहे. त्यांनी अर्जांची छाननी करताना या सर्व गोष्टींची पडताळणी केली पाहिजे. केवळ त्यांनी संबंधित संस्थेचा दाखल जोडला म्हणजे तो पात्र होऊ शकत नसल्याने येथे अधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे.
याची लागणार चाळण
संघास प्रतिवर्षी २४० दिवस किमान ४० हजार लिटर दूध घालणे.
सलग तीन वर्षे किमान दहा टन पशुखाद्य प्रत्येक वर्षी खरेदी करणे
संलग्न संस्थेच्या पंचकमिटी सदस्य असावा.