कोल्हापूर : कोण कुठेही गेले, तरी त्याची फारशी चिंता करण्याचे काम नाही. सामान्य जनता अजूनही आपल्यासोबत आहे; त्यामुळे जिल्ह्यातील १0 जागांवर ताकदीने लढत देण्याचा निर्धार बुधवारी येथे झालेल्या दोन्ही काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांनी व्यक्त केला.
येथील शाहूपुरीतील श्रीपतरावदादा बँकेच्या सभागृहात ही बैठक झाली. त्यास काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते.आपण एकदिलाने एकत्र आलो, तर अजूनही काँग्रेसचा पराभव करण्याची हिंमत कुणामध्ये नाही; त्यासाठी आपापसांतील छोटे-छोटे वाद मिटवूया. राष्ट्रवादी काँग्रेसकडे कागल, चंदगड, राधानगरी आणि शिरोळ या मतदारसंघात ताकदीचे उमेदवार तयार आहेत.
काँग्रेसकडेही कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर व हातकणंगले मतदारसंघात सक्षम उमेदवार आहेत. शिरोळची जागा स्वाभिमानीच्या जागा वाटपात कुणाला जाणार याचा निर्णय लवकर घेतला जावा, यासाठी प्रदेश काँग्रेसकडे प्रयत्न करण्याचे ठरले. इचलकरंजीत जरी प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तरी तिथे नवीन रक्ताला वाव देऊन चांगला उमेदवार देऊ. तिथे दोन्ही काँग्रेसची एकत्रित मोट बांधण्याचा निर्णय झाला.
आवाडे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बाजूला गेली होती. आता ती अडचण दूर झाली आहे. भाजप-शिवसेनेमध्ये सध्या दुसऱ्या पक्षांतून नेत्यांना आयात करण्याची स्पर्धा लागली आहे. त्याबद्दल लोकांमध्ये कमालीची चीड आहे. आपण सक्षम पर्याय देऊन या सगळ्यांविरोधात ताकदीने एकजुटीने उभे राहिलो, तर लोक नक्की पाठबळ देतील, असा विश्वास बैठकीत व्यक्त झाला.